(उज्जैन)
अवघ्या देशाला हादरावून सोडणाऱ्या उज्जैन बलात्कार प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. या प्रकरणातील आरोपी शॉर्ट एन्काऊंटरमध्ये जखमी झाला आहे. पोलिसांनी आरोपी भरत सोनी याला ताब्यात घेतलं होतं. त्याला घटनास्थळावर उलट तपासणीसाठी घेऊन गेले होते. पण त्यावेळी त्याने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारात जखमी झाला आहे. त्याच्या पायाला गोळी लागली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत 2 पोलीस सुद्धा जखमी झाले आहे. जखमी अवस्थेत या नराधम आरोपीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
उज्जैन शहरातील महाकाल पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुरलीपुरा येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली. पीडित मुलगी बेशुद्धावस्थेत आढळून आली. तिला नीट बोलताही येत नव्हतं. कपड्यातून रक्त वाहत होते. उज्जैनच्या संवरखेडी कॉलनीत ही मुलगी तब्बल अडीच तास रक्ताच्या थारोळ्यात पडून रस्त्यावर भटकत राहिली. मात्र, तिच्या मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही, असे सांगण्यात येत आहे.
या मुलीला कॉलनीतील एका घराबाहेर उभ्या असलेल्या तरुणाकडेही मदत मागितली, मात्र तरुणाने मदत केली नाही. महाकाल पोलीस स्टेशनला मिळालेल्या या तरुणीच्या फुटेजमध्ये ती अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावर मदत मागताना दिसत होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपींचा शोध सुरू केला.