(रत्नागिरी)
राज्यात २०२१ – २२ च्या यू-डायस प्रमाणे २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे एकत्रिकरण करून समूह शाळा योजना सुरू करण्याच्या हालचाली शिक्षण विभागाने केल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील २ हजार ४४६ शाळांपैकी १ हजार ३४५ शाळा बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर या शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न उपस्थित होणार आहे.
राज्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करा आणि त्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘क्लस्टर स्कूल’ (समूह शाळा) सुरू करण्याचे प्रस्ताव १५ ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. नंदूरबार येथील तोरणमाळ व पुण्यातील पानशेत या दोन क्लस्टर स्कूलच्या धर्तीवर या समूह शाळा उभारल्या जातील. कमी पटसंख्येच्या शाळांना कुलूप ठोकल्यानंतर या शाळांचे विद्यार्थी समूह शाळेत समायोजित होणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे घरातून किती अंतर वाढणार आहे.
या शाळा बंद केल्याने अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे काय होणार, हाही प्रश्न आहे. जिल्ह्यातील २ हजार ४४६ शाळांपैकी तब्बल १ हजार ३४६ शाळा या ० ते २० पटसंख्येच्या आहेत. या शाळेतील हजारो शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. त्यांचे काय करणार? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात ० ते ५ पटसंख्येच्या २४९ , ६ ते १० पटाच्या ४२०, ११ ते १५ पटाच्या ३९२, १६ ते २० पटसंख्येच्या २८५ शाळा आहेत.