( मुंबई )
राज्यात शिक्षक भरतीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. या प्रकरणी एका तरुणाने सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी मंगळवारी दुपारी मंत्रालयात निदर्शने केली. त्याने मंत्रालयाच्या इमारतीवरून खाली उडी मारली. त्यानंतर हा तरुण मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर पडला. त्यामुळे त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. यानंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तरुणाला जाळीबाहेर काढून ताब्यात घेतले.
रणजीत आव्हाड असे आंदोलन करणाऱ्या तरुणाचे नाव असून तो आळंदीमधये कंत्राटी शिक्षक आहे. त्याचे मुळगाव आंबेजोगाई आहे. प्रकल्पग्रस्त आहे, त्यामुळे शेतीही फारशी नाही आणि नोकरीही नाही. तिसऱ्या पिढीमध्ये एकालाही शासकीय नोकरी नसल्याचं या व्यक्तीचं म्हणणं आहे. लवकरात लवकर शिक्षक भरती करण्यात यावी अशी मागणी या तरुणाने केली आहे.
हा तरुण उसतोड कामगार आणि प्रकल्पग्रस्त असल्याचे समजत आहे. या तरुणाने सुरक्षा जाळीवर उडी मारल्यानंतर मंत्रालयामध्ये एकच गोंधळ उडाला. त्यानंतर मंत्रालयातील पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सुरक्षा जाळीवर उडी मारत या तरुणाला बाहेर काढले. त्यानंतर पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले.