(पाटणा)
सर्व मंत्री आणि सरकारी अधिकार्यांनी सकाळी 9.30 पर्यंत आपापल्या कार्यालयात उपस्थित राहावे, असा आदेश बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी दिला. नितीश कुमार यांनी मंगळवारी राजधानी पाटण्यातील बेली रोडवर असलेल्या विकास भवन (नवीन सचिवालय) आणि विश्वेश्वरय्या भवन (तांत्रिक सचिवालय) यांना अचानक भेटी दिल्या.
विकास भवनाच्या भेटीत कुमार यांना काही मंत्री त्यांच्या दालनात उपस्थित नसल्याचे आढळून आले. याबद्दल नितीश कुमार यांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री सकाळी 9.30 वाजता विकास भवनात पोहोचले. त्यांनी मंत्र्यांची दालने, वरिष्ठ अधिकारी आणि कार्यालयांची पाहणी करून मंत्री, अधिकारी आणि कर्मचार्यांच्या उपस्थितीची माहिती घेतली.
मुख्यमंत्र्यांनी शिक्षणमंत्र्यांच्या कक्षाला भेट दिली, तेव्हा ते अनुपस्थित होते. संतप्त मुख्यमंत्र्यांनी त्यांना लगेच फोन करून सकाळी 9.30 वाजता कार्यालयात न पोहोचण्याचे कारण विचारले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विश्वेश्वरय्या भवनला भेट दिली. येथे राज्य नियोजन मंडळ, ग्रामीण बांधकाम विभाग, रस्ते बांधकाम विभाग, लघु जलसंपदा विभाग इत्यादींसह सहा विभागीय कार्यालये आहेत. सर्व अधिकार्यांनी सकाळी 9.30 पर्यंत आपापल्या कार्यालयात पोहोचावे, अशी माझी इच्छा आहे. माझ्या तपासणीत जे गैरहजर आढळले, त्यांना ताबडतोब अनुपस्थितीचे कारण विचारले जाईल, असे नितीश कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.