(क्रीडा)
रवीचंद्रन अश्विनला अचानक एकदिवसीय संघात स्थान मिळाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण, आपल्या विरोधकांना त्याने आपल्या कामगिरीनेच चोख उत्तर दिलं आहे. रविवारी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अश्विनने ७ षटकांत ४१ धावा देत ४ गडी बाद केले. या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाला २१७ धावांत गुंडाळले. तसेच पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात १०० धावांनी विजय मिळवला.
त्याचवेळी अश्विनने अनिल कुंबळेचा आणखी एक महत्त्वाचा विक्रम मागे टाकला आहे. एकाच संघाविरुद्ध सर्वात जास्त बळी घेण्याचा अनिल कुंबळेचा विक्रम अश्विनने मागे टाकला. अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये १४४ गडी बाद केले आहेत. यापूर्वी अनिल कुंबळे याने याच संघाविरुद्ध १४२ गडी बाद केले होते.
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्याबद्दल बोलायचं झालं तर इंदूरला झालेल्या या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे ऑस्ट्रेलियन डाव १७ षटकांनी कमी करण्यात आला त्यांच्यासमोरचं आव्हानही ४०० धावांऐवजी ३१७ धावांचं करण्यात आलं. पण, सुरुवातीपासून ऑस्ट्रेलियन गडी बाद होत गेले. त्यामुळे मोठी भागिदारी न झाल्यामुळे ३३ षटकांत २१७ धावांत त्यांचा संघ गडगडला.
त्यापूर्वी भारतीय संघाने आपल्या निर्धारित ५० षटकात ५ गडी गमावून ३९९ धावांचा डोंगर उभा केला. यात श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल यांनी वैयक्तिक शतकं पूर्ण करतानाच दुसऱ्या गड्यासाठी दोनशे धावांची भागिदारीही केली. त्याशिवाय के एल राहुलने ५२ तर सुर्यकुमार यादवने झंझावाती ७२ धावा केल्यामुळे भारतीय संघ ४०० धावांच्या जवळपास पोहोचला.