(गणपतीपुळे/ वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील पर्यटक निवासात बुधवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येणार आहे. या जागतिक पर्यटन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री क्षेत्र गणपतीपुळे हे जागतिक पर्यटन व धार्मिक क्षेत्र म्हणून ओळखले जाते. गणपतीपुळेला देश -विदेशातील अनेक भक्त- पर्यटक भेटी देत असतात. त्यामुळे 27 सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन गणपतीपुळे येथील पर्यटक निवासात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून यावर्षीचे जागतिक पर्यटन दिनाचे घोषवाक्य ‘पर्यटन आणि हरित गुंतवणूक’ असे आहे.
पर्यटक निवास गणपतीपुळे येथे जागतिक पर्यटन दिन कोकण विभागीय प्रादेशिक व्यवस्थापक संजय ढेकणे तसेच दीपक माने यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात येणार असल्याचे पर्यटक निवास गणपतीपुळेचे व्यवस्थापक वैभव पाटील यांनी सांगितले. या पर्यटन दिनाच्या कार्यक्रमात पर्यटकांचे स्वागत, पर्यटन दिंडी, स्वच्छता अभियान, पर्यटन दिनानिमित्त मार्गदर्शनपर मनोगते अशा स्वरूपात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती गणपतीपुळे येथील पर्यटन निवासाच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
या कार्यक्रमाला गणपतीपुळे परिसरातील पर्यटन व्यावसायिक, पर्यटन प्रेमी, पर्यटन संस्था, संघटनेचे पदाधिकारी व स्थानिक ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गणपतीपुळे येथील पर्यटक निवासाचे प्रमुख व्यवस्थापक वैभव पाटील यांनी केले आहे