(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील विल्ये गावात गेली अनेक दिवसांपासून बिबट्याचा मुक्त वावर असून अनेक बकऱ्या, कुत्रे ठार मारण्याचे प्रकार सुरू असतानाच सोमवार दि.२५ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास विल्ये देसाईवाडी येथील शेतकरी श्री. चंद्रकांत काशिराम साळवी यांच्या मालकीच्या गाईचे दोन महिन्यांच्या वासराला बिबट्याने वाड्यात घुसून ठार केल्याची घटना घडली.
जीवापाड जनावरे सांभाळणाऱ्या साळवी कुटुंबाला या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. सोमवारी सकाळी बिबट्याने श्री.साळवी यांच्या वाड्यात घुसून वासरावर हल्ला केल्याचा कानोसा गावचे सामाजिक कार्यकर्ते व प्रगत शेतकरी श्री.अमर आझाद देसाई यांना मिळताच त्यांनी तात्काळ साळवी यांच्या गोठ्याकडे धाव घेतली आणि मोठ्या आवाजाने बिबट्याला हटकून लावण्याचा मोठा धाडसी प्रयत्न करत असतानाच या हल्ल्यात हे वासरू गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाले होते, अशा स्थितीत अमर देसाई यांनी या वासराला पाणी पाजून वाचवण्याचा प्रयत्न केला असता, अखेर ते वासरू मृत्युमुखी पडले.
या घटनेची माहिती गावचे सरपंच स्वप्निल देसाई व प्रगत शेतकरी अमर देसाई , चंद्रकांत साळवी यांनी वनविभागाला दिल्यानंतर वन खात्याचे अधिकारी व पशुवैद्य अधिकारी यांनी विल्ये येथील झालेल्या घटनेची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी वनपाल श्री.गावडे, वनरक्षक-प्रभू साबणे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद एकवडे यांच्या समवेत सरपंच स्वप्निल देसाई, अमर देसाई, चंद्रकांत साळवी, काशिराम साळवी, प्रकाश कांबळे यांनी बिबट्याच्या मुक्त वावरामुळे गावात उद्भवलेल्या समस्या अधिकारी वर्गाला सांगितल्या.विल्ये गावात बिबट्याचा वावर सुरू आहे.
गावात कुत्रे, बकऱ्या मारल्या जात आहेत, अशावेळी शेतकरी व ग्रामस्थांनी अशा घटनांची माहिती वन खात्याला त्वरित देणे गरजेचे आहे. मात्र काही लोक अशा घटनांची रीतसर तक्रार करत नाही. त्यामुळे वनविभागाचे अशा घटनांकडे दुर्लक्ष होत असते. त्यामुळे अशा हल्ल्याच्या किंवा नुकसानीच्या घटना घडल्यास शेतकऱ्यांनी तत्परतेने वनविभागाला कळवावे, असे आवाहन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी येथील ग्रामस्थांना केले. बिबट्याच्या या हल्ल्यामुळे विल्ये गावातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. चारा पाण्यासाठी गुरे बाहेर सोडायची की नाही? असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे वन खात्याने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गावचे सरपंच स्वप्निल देसाई, युवा नेते अमर देसाई ,चंद्रकांत साळवी, प्रकाश कांबळे यांनी केली आहे. अलिकडे विल्ये,खालगाव- जाकादेवी परिसरात संध्याकाळच्या दरम्याने बिबट्या मुक्तपणे फिरत असताना अनेकांनी पाहिले आहे. या घटनेची गंभीर दखल वनविभागाने घ्यावी, अशी आग्रही मागणी होत आहे.