(वैभव पवार / गणपतीपुळे)
रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे तीर्थक्षेत्रामध्ये घरोघरी गणपतीची पार्थिव मूर्ती न आणता गणेशोत्सव येथील स्वयंभू गणपती मंदिरात साजरा केला जातो. मात्र, या ठिकाणी गौराई देवीचा उत्सव मोठ्या भक्तीभावाने घरोघरी साजरा केला जातो. या उत्सवाची सांगता शनिवारी झाली असून गौराई मातेला गणपतीपुळे येथील ग्रामस्थांनी भावपूर्ण वातावरणात निरोप दिला.
गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात सुमारे 55 घरांमध्ये गौराई मातेचा उत्सव साजरा केला जातो. दिनांक 21 सप्टेंबर रोजी गौराई देवीचे आगमन झाले. त्यादिवशी गौराई देवीचे पूजन झाल्यानंतर दोन दिवस भजन, जाखडी, महिलांच्या फुगड्या असे कार्यक्रम पार पडले. तसेच दिनांक 23 रोजी सायंकाळी 3 वाजता मानेवाडी तसेच केदारवाडी येथील गौराई देवीला येथील ग्रामस्थांनी ढोल ताशांच्या गजरात भावपूर्ण निरोप दिला.यावेळी गौराई विसर्जन मिरवणूक तीन वाजता चालू झाली त्यानंतर गणपतीपुळे येथील खाडीवर गौराई देवीचे विसर्जन करण्यात आले.
या मिरवणुकी दरम्यान या कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जयगड पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीपुळे पोलीस स्थानकाच्या पोलीस उपनिरीक्षक क्रांती पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळवी, पोलीस कॉन्स्टेबल निलेश गुरव, पोलीस नायक जयेश कीर, होमगार्ड सुरज जाधव , अनिकेत जाधव आदी मिरवणूकीवर लक्ष ठेवून होते. गणपतीपुळेसह जयगड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये संपूर्ण विसर्जन मिरवणुका दरम्यान पोलिस गस्त घालताना दिसून येत होते. गणपतीपुळे येथे भावपूर्ण वातावरणात गौराई मातेला निरोप देण्यात आला.