(खेड / भरत निकम)
इंटरनेटवर विवाह जुळविणाऱ्या ‘शादी डॉटकॉम’च्या संकेत स्थळावर फेक प्रोफाईल बनवून अविवाहित व विधूर तरुणांना लुबाडणारास खेड पोलिसांनी अटक केली आहे. मनोज छोटूराम योगी (४१, रा. लोढा हेवंस, डोंबिवली, जि.ठाणे) असे अटक केलेल्या इसमाचे नाव असून तो मुळचा राजस्थान येथील आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुंदर मुलीशी लग्न व्हावे, अशी प्रत्येक तरुणाची इच्छा असते. त्याप्रमाणे लग्नाच्या जुळणीकरिता प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्नात असतो. कुणी नातेवाईक यांच्यामार्फत तर काहीजण इंटरनेटवरील उपलब्ध वेबसाईटवर सुंदर मुली बघण्याचा प्रयत्न करतात. तसेच इंटरनेटवर एक प्रोफाईल बनवून ती नोंदणीकरिता प्रसिद्ध केली जाते. अशा प्रोफाइल वाचून त्याप्रमाणे मुलीशी संपर्क झाल्यावर लग्नं ठरवले जाते, हा ट्रेंड सध्या प्रचलित झालेला आहे. यातूनच गेल्या अनेक वर्षांपासून इंटरनेटवर ‘शादी डॉटकॉम’ या नावाजलेल्या वेबसाईटवर तरुण, तरुणींसह विधुरांच्या लग्न जुळणीकरिता मनोज छोटूराम योगीने सुंदर मुलींचे फोटो वापरुन प्रोफाइल बनवून टाकली होती. याच वेबसाईटवर खेडमधील एका विधुर तरुणाने नोंदणी केली होती. ही नोंदणी केल्यानंतर काही दिवसांनी याच संकेतस्थळावरुन एक सुंदर मुलीचा फोटो असलेल्या तरुणीने लग्नाकरिता होकार कळवून लग्नाला आपल्याकडून पसंती दिली.
त्यानंतर एकमेकांचे नंबर देवून वाॅटसअपव्दारे संपर्कावरुन दोघांची चांगली ओळख झाली होती. समोरच्या सुंदर तरुणीने वाॅटसअप नंबरवर सतत संपर्क ठेवला होता. या समाज माध्यमावरुन आणखीन काही स्वतःचे फोटोही तरुणीने पाठवले होते. हे पाठवलेले फोटो पाहून समोरची मुलगी सुंदर असल्याची खात्री खेडच्या विधुर तरुणाची झाली होती. दोघांचेही अधुनमधून वाॅटसअपवरुन बोलणं होतं होते. एक दिवस समोरच्या तरुणीने घरी आई-वडील आजारी असल्याचे सांगून खेडमधील तरुणाकडे पैशांची मागणी केली. ही सुंदर तरुणी आपल्याबरोबर लग्न करणार असल्याने आनंदात त्याने ७७ हजारांची रक्कम मोबाइलवरुन तरुणीस पाठवून दिले. यानंतर मात्र विवाहाची बोलणी केल्यावर समोरुन तरुणी बोलण्यास टाळाटाळ करीत होती. तसेच त्यानंतर आजारपणाकरीता आपण दिलेले पैसे परत मागितल्यावर मोबाईल नंबर ब्लाॅक केला गेला. यावेळी आपली स्वतःची फसवणूक झाल्याचे विधुर तरुणाच्या लक्षात आले. त्या विधुरने थेट पोलिस ठाण्यात धाव घेत घडलेली घटना पोलिसांना सांगितली. पोलिसांनी ठाण्यातील गुन्हा रजिस्टर नंबर २७७ नुसार भादवि कलम ४२० आणि आयटी कायदा कलम ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल केला.
दरम्यान, रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या तपासकामी एकपथक स्थापन केले. यापथकाने तपासाची चक्रे फिरली व सुंदर मुलींचे फोटो वापरुन फसवणूक करणाऱ्या मनोज छोटूराम योगी (४१, रा. लोढा हेवंस, डोंबिवली, जि. ठाणे) या मुळच्या राजस्थान येथील इसमाला गुन्ह्यात वापरलेले दोन्ही मोबाईल व चारचाकी कारसह ताब्यात घेतले आहे. खेड पोलिस ठाण्यातील पथकामध्ये पोलिस निरीक्षक नितीन भोयर, उपनिरीक्षक सुजीत सोनावणे, काॅंन्टेबल अजय कडू, वैभव ओहोळ, श्रध्दा पवार, शबाना मुल्ला, रमीज शेख आदींचा समावेश होतो. त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने तपासाची कामगिरी केली आहे. ‘शादी डॉटकॉम’ यासारख्या नामांकित वेबसाईटवर सुंदर मुलींचे फोटो वापरुन त्याव्दारे तरुणांजवळ बोलून आजारपणाचे कारणं सांगून लुटण्याचा नवा ट्रेंडसमोर आला आहे. अशा फसवणूकीपासून तरुण तरुणींनी सावध रहावे. तसेच आपल्या आजूबाजूला असे प्रकार घडत असल्यास नजीकच्या पोलिस ठाण्याशी अथवा ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे.