आपल्या देशात संयुक्त कुटुंब संस्कृती आहे. इथे मोठी कुटुंबे अनेक पिढ्या एकत्र राहतात. मात्र, आता चित्र हळूहळू बदलत आहे आणि छोटे कुटुंब म्हणजेच न्यूक्लियर फॅमिली पाहायला मिळते. अशा स्थितीत संपत्ती (मालमत्ता) वाटपाच्या वेळी वडिलोपार्जित मालमत्तेतील वाट्याबाबत अनेकवेळा मतभेद झाल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. बऱ्याच जणांना आपल्याला आपल्या आजोबांच्या प्रॉपर्टीचा किती वाटा मिळेल, कधी मिळेल, याबद्दल उत्सुकता असते.
वडिलोपार्जित किंवा तुमच्या आजोबांच्या काळात जी जमीन एका कुटुंबासाठी होती त्याचे आज अनेक तुकडे होतात. मात्र, कोणाला किती वाटा मिळणार असा प्रश्न नेहमीच उपस्थित होतो. तर फक्त तुमच्या वडिलांच्या वाट्याची मालमत्ता तुम्हाला मिळेल असे याचे उत्तर आहे.
म्हणजेच एखाद्या व्यक्तीचे आजोबा वारले, तर त्या आजोबांची प्रॉपर्टी पहिल्यांदा त्यांच्या मुलाला (म्हणजेच आजोबांच्या नातवाच्या वडिलांना) मिळेल, नातवाला मिळणार नाही. त्यानंतर नातवाला त्याच्या वडिलांकडून संपत्तीतला वाटा मिळेल; मात्र नातवाचे वडील आजोबांच्या (म्हणजे वडिलांचे वडील) आधी मरण पावले, तर मात्र नातवाला आजोबांच्या संपत्तीतला वाटा थेट मिळेल.
जेव्हा एखादी व्यक्ती मृत्युपत्र (इच्छापत्र) न करता मरण पावते, तेव्हा संपत्तीवाटपाबद्दलचा प्रश्न उपस्थित होतो. भारतीय कायद्यानुसार, आजोबांच्या स्वतःच्या संपत्तीवर नातवाचा जन्मसिद्ध अधिकार अजिबात नसतो. तर, पूर्वजांच्या पारंपरिक संपत्तीवर त्याचा जन्मसिद्ध अधिकार असतो. म्हणजेच आजोबांना त्यांच्या पूर्वजांकडून मिळालेल्या (वडिलोपार्जित) संपत्तीतला नातवाचा वाटा त्याचा जन्म झाल्या झाल्या निश्चित होतो; मात्र त्याच्या आजोबांनी स्वतः विकत घेतलेली काही प्रॉपर्टी असेल, तर ते ती कोणाच्याही नावे करू शकतात. त्याला नातू आक्षेप घेऊ शकत नाही.
एखादी व्यक्ती इच्छापत्र करण्याआधीच मरण पावली, तर त्या व्यक्तीची स्वतःची प्रॉपर्टी त्या व्यक्तीचे जवळचे वारसदार म्हणजेच त्याची पत्नी, मुलगा, मुलगी यांच्या नावे होते. त्या व्यक्तीच्या नातवाला त्यातला वाटा मिळत नाही. मृत व्यक्तीची पत्नी, मुलगा, मुलगी यांच्याकडे वारसा हक्काने आलेली प्रॉपर्टी ही त्यांची वैयक्तिक प्रॉपर्टी समजली जाते. त्या प्रॉपर्टीत वाटा मागण्याचा अधिकार अन्य कोणालाही नसतो. संबंधित व्यक्तीचा मुलगा किंवा मुलगी यांचा त्या व्यक्तीच्या आधी मृत्यू झाला असेल, तर पहिला मुलगा किंवा मुलगी यांना त्यांच्या वडिलांच्या संपत्तीतला जो वाटा मिळणार असेल तो त्यांच्या कायदेशीर वारसाला मिळेल.
मृत्युपत्र लिहिल्यानंतर निधन झाल्यास वाटणीबाबत कोणताही वाद होण्याची शक्यता कमी असते. इच्छापत्रात अनेक वेळा सर्व काही एकाच व्यक्तीला दिले जाते, जे कायदेशीररित्या वैध आहे आणि यांनतर अन्य कोणीही मालमत्तेवर दावा करू शकत नाही. मात्र, मृत्युपत्र नसेल तर वारसाहक्काच्या आधारे त्याची विभागणी केली जाते. यामध्ये वारसांना मालमत्ता दिली जाते. हिंदू उत्तराधिकार कायदा १९५६ मध्ये वारसदार कोण आहे, याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.
(सूचना – वरीलल माहिती काही कायद्यानुसार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी कायदेतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)