(रत्नागिरी)
केंद्र शासनाने २५ हजार मेगावॅट सौरऊर्जा तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य देण्यास सुरुवातही केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा वाटा आणि सहभाग असणार आहे. त्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन जिल्हा कृषी विभागाने केले आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे विजेवर चालणाऱ्या मोटारी नाहीत त्यांना इंजिनद्वारे सिंचन करावे लागते, ते सौरऊर्जेवर चालणारी मोटर बसवून सिंचनाची सोय करू शकतात. ज्या शेतकऱ्यांकडे विजेवर चालणारी मोटर आहे तेथे सोलरचा वापर करून मोटर चालवू शकतात. तसेच जास्त झालेली वीज कंपनीला विकू शकतात. यातून शेतकरी विजेच्या दृष्टीने स्वावलंबी होतील. परंतु, ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतामधून वीजनिर्मिती करायची आहे त्यांना तिसरा पर्याय म्हणजे पूर्ण सोलर पॅनेल बसवून वीज तयार करून ती वीज कंपनीला विकणे, असा आहे.
शेतकऱ्याला त्याच्या शेतातून वीज विकून आर्थिक फायदा होतो. एकदाच गुंतवणूक केली तर २५ वर्षे उत्पादन मिळण्याची हमी मिळते. याला जास्त खर्च नाही. वीज ठरवून दिलेल्या दराने खरेदी करण्याचा कंपनी करार करते. तयार झालेली वीज मोजून कंपनीला देण्याची सोय असते आणि ठरवून दिलेल्या दराने रक्कम मिळते. आता दिवसेंदिवस घरगुती, औद्योगिक तसेच शेतीसाठी विजेचा वापर वाढणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी योजनेच्या सहभागासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे