(खेड)
खेड शहरातील जगबुडी नदीमध्ये काही मगरींचा वावर असल्याने दीड दिवसाचे गणपती विसर्जन करताना येथील विसर्जन कट्टा मंडळाच्या सदस्यांना आपला जीव मुठीत धरून गणरायाचे विसर्जन करावे लागले होते. या मगरींना पळवून लावण्यासाठी नदीमध्ये फटाक्यांचे बॉम्ब फोडून त्यांना पळवून लावावे लागले. याची दखल वनविभागाने घेऊन पाच दिवसाच्या गणपती विसर्जनामध्ये कोणती अडचण येऊ नये, यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. खेड शहरातून वाहणाऱ्या जगबुडी नदीत अनेक छोट्या मोठ्या मगरी पावसाच्या पाण्यामुळे आल्या आहेत. त्या येथील प्रवाहात मुक्त फिरताना दिसत असल्याने अनेकांनी जगबुडी नदीत उतरणे बंद केले आहे.
गणपती विसर्जन करताना या महाकाय मगरी गणेश भक्तांवर हल्ला करून त्यामुळे जीवावर बेतण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणपती विसर्जन करताना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत.