(रत्नागिरी)
मुलींच्या सक्षमीकरणासाठी मागील सरकारच्या काळात तयार करण्यात आलेली माझी कन्या भाग्यश्री योजना गुंडाळून त्या जागी जाहीर करण्यात आलेली लेक माझी लाडकी ही योजना अद्याप कागदावरच आहे. या योजनेसाठी लागणाऱ्या ७०० कोटी रुपयांची तरतूद झालेली नाही. या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून पाच टप्प्यात सरकारच्यावतीने जवळपास ९८ हज़ार रुपये दिले जाणार आहेत.
राज्यात महिलांची संख्या पाच कोटी ४१ लाखांपेक्षा जास्त आहे. यात मुलींची संख्या दोन कोटी आहे. या मुलींच्या सक्षमीकरणासाठी मागील सरकारने “माझी कन्या भाग्यश्री” योजना लागू केली होती. पिवळे व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबाच्या घरातील मुलीच्या जन्माच्या वेळी एक लाख रुपये सरकारच्यावतीने एकाच वेळी दिले जात होते. या एक लाख रुपये रकमेत मुलीचे शिक्षण आणि संगोपन व्हावे अशी सरकारची अपेक्षा होती.
यंदाच्या मार्चमधील अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ‘लेक माझी लाडकी’ या नवीन योजनेची घोषणा केली. या योजने अंतर्गत मुलीचा जन्म झाल्यानंतर तिच्यासाठी पाच हजार रुपये पालकांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. त्यानंतरही मुलीच्या चौथीच्या शिक्षणासाठी चार हजार रुपये, सहावीच्या शिक्षणासाठी सहा हजार रुपये आणि ११ वीसाठी आठ हजार असे २३ हजार रुपये आणि मुलीचे वय १८ झाल्यानंतर तिच्या खात्यात ७५ हजार रुपये जमा केले जाणार आहेत. त्यामुळे एका मुलीसाठी सरकारच्यावतीने एकूण ९८ हजार रुपये पाच टप्प्यांत दिले जाणार आहेत.
ही सर्व कामे जिकिरीची…
ही योजना केवळ दोन मुलींसाठी लागू असून यावर सरकारला दरवर्षी सहाशे ते सातशे कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. केवळ सवंग लोकप्रियतेसाठी जाहीर करण्यात आलेल्या या योजनेवर होणाऱ्या खर्चाची तरतूद करावी कशी, असा प्रश्न वित्त विभागाला पडला असून ही योजना अद्याप कागदावर आहे. या योजनेची अंमलबजावणी करावी कशी, असा दुसरा प्रश्न महिला विकास विभागाला सतावत आहे. राज्यातील प्रत्येक मुलीच्या जन्माची नोंद ठेवणे, ती शाळेत गेल्यानंतर तिच्या शिक्षणाप्रमाणे चौथी, सहावी. अकरावीत ठरल्याप्रमाणे योजनेतील रकमेची तरतूद करणे हे सर्व जिकिरीचे काम असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.