(पुणे)
यंदा राज्यात पाऊस उशिरा दाखल झाला. त्यातच अपेक्षित पाऊस झाला नसल्याने अनेक भागात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात १ जून ते १८ सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीचा विचार करता सरासरीपेक्षा नऊ टक्के कमी पाऊस पडला. सध्या राज्यातील १३ जिल्ह्यांवर दुष्काळाचे सावट असून, काही जिल्हे तर थेट रेड झोनमध्ये असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. त्यामुळे चिंता आणखी वाढली आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत परिस्थिती गंभीर आहे. तुरळक ठिकाणीच पाऊस झाल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे लातूर, नांदेडमधील स्थितीदेखील गंभीर असताना या दोन्ही जिल्ह्यांना रेड झोनमधून वगळले आहे.
राज्यात पावसाने दडी मारल्याने परिस्थिती गंभीर होत चालली आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी १३ जिल्ह्यांत पिण्यासाठी पाणी, जनावरांच्या चा-याची परिस्थिती गंभीर आहे. यंदा मान्सूनचा पाऊस सरसकट झाला नाही. त्यातल्या त्यात मराठवाड्यात तर अत्यंत बिकट स्थिती आहे. कोकण आणि गोव्याचा काही भाग, तसेच मुंबई, ठाणे आणि नांदेड जिल्हा सोडल्यास इतर ठिकाणी पाऊस सरासरी इतका आहे. तसेच राज्यातील १३ जिल्ह्यांत तर सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे हे जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. येथे भीषण दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे.
जून ते सप्टेंबर असा पावसाचा कालखंड आहे तर ऑगस्ट आणि जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस होत असतो. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण कमी असते. मागील काही वर्षांचा इतिहास पाहिल्यास सप्टेंबर महिन्यात पाऊस कमीच असतो. दरम्यान, आजपासून पुढील पाच ते सात दिवसांचा अंदाज पाहिल्यास या काळात खूप असा पाऊस होईल, याची शक्यता कमीच असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे मोठा पाऊस होण्याची शक्यता कमी आहे.
रेड झोनमधील १३ जिल्हे
राज्यातील १३ जिल्ह्यांत तर सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला आहे. यामध्ये अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांत सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला. त्यामुळे या जिल्ह्यांवर दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे हे जिल्हे रेड झोनमध्ये असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांचा समावेश
यंदा राज्यात अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. यात ३६ पैकी १३ जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये मराठवाड्यातील ८ पैकी ६ जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यात नांदेड आणि लातूरला वगळले आहे आणि छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली या ६ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असल्याचे म्हटले आहे.
लातूर, नांदेडला वगळले
लातूर, नांदेड जिल्ह्यांत पावसाची सरासरी आकडेवारी ब-यापैकी दाखवत आहेत. परंतु प्रत्यक्षात या दोन्ही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी अधिक पाऊस पडला आहे, तर बहुतांश भागात पाऊस खूप कमी झाला आहे. त्यामुळे खरीप पिके संकटात सापडले असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. परंतु पावसाच्या सरासरीचा नियम लावून लातूर, नांदेडला वगळल्याने हवामान खात्याविरोधात संताप व्यक्त होत आहे.
कमी दाबाचे क्षेत्र राजस्थानकडे निघून गेल्यामुळे आणि राज्यात मोसमी पाऊस पडण्यास पोषक स्थिती नसल्यामुळे राज्यभरात पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील पाच दिवस मोसमी पाऊस राज्यात उघडीप देण्याचा अंदाज आहे. अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर हलक्या सरी पडण्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पावसाचा हा खंड पाच दिवसांहून जास्त वाढल्यास टंचाईची स्थिती आणखी गंभीर होऊ शकते.