(मुंबई)
थकीत कर्ज वसुलीसाठी भारतातील सर्वात मोठ्या सरकारी बँक एसबीआयने (SBI) अनोखी युक्ती आखली आहे. ज्या कर्जदाराचे कर्ज थकलेले आहे, अशा ग्राहकांच्या घरी बँक कर्मचारी चॉकलेटचा बॉक्स घेऊन जाणार आहेत. कर्जदारांना चॉकलेट देऊन त्यांच्या कर्जाची आठवण करून दिली जाणार आहे.
मागील काही दिवसांपूर्वी SBI ने प्रायोगिक तत्वावर ही अभिनव युक्ती सुरु केली. त्याच्या यशानंतर आता बँकेने याची अधिकृत घोषणा केली आहे. जे कर्जदार कर्जाचा हप्ता (EMI) वेळेवर भरत नाहीत, कर्ज डीफॉल्ट करण्याचा प्रयत्न करतात ते बँकेच्या रीमाइंडर कॉलला देखील प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे कर्जदारांना न सांगता बँक कर्मचारी थेट कर्जदार ग्राहकांच्या घरी जाणार आहेत.
किरकोळ कर्जाच्या व्याजदरात वाढ झाल्यानंतर अनेक ग्राहक वेळेवर हप्ते भरत नाहीत, असे निरीक्षण बँकेच्या निदर्शनास आले. त्यामुळे अशा कर्जदारांकडून कर्ज वसूल करण्यासाठी बँकेने नवीन युक्ती सुरु केली आहे. बँकेचे कर्मचारी संबंधित ग्राहकाच्या घरी चॉकलेट घेऊन जातील. त्यांच्याशी भेटून त्यांना कर्जाचा हप्ता थकला आहे, याची आठवण करून देतील.