सर्व विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्याच्या फक्त कल्पना करीत आहेत. मात्र, कितीही शेळ्या आणि मेंढ्या कळपाने आल्या तरी, त्या सिंहाशी लढा देऊ शकत नाही, असा जोरदार हल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी येथे चढविला.
श्रीनगरमधील एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिंदे बोलत होते. विरोधकांच्या एकत्र येण्यावर माझा मुळीच आक्षेप नाही. मी एवढेच म्हणत आहे की, शेळ्या आणि मेंढ्यांचा कळप जंगलात एका सिंहासोबत लढा देऊ शकत नाही. सिंह हा सिंहच असतो आणि जंगलात त्याचेच राज्य असते, असे ते म्हणाले. भाजपाप्रणीत रालोआविरोधात लढा देण्यासाठी 26 विरोधी पक्ष एकत्र आले आहेत, याकडे लक्ष वेधले असता, आपण पंतप्रधान मोदी यांना पराभूत करू शकतो, अशी त्यांची कल्पना आहे. मात्र, विरोधकांमध्ये ती ताकद मला तरी दिसली नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला आव्हान देण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येत असल्याबद्दल विचारले असता, शिंदे म्हणाले की, विरोधक फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींना पराभूत करण्याचा विचार करतात. पण मला कोठेहीं ते प्रभावीपणे कार्यरत झालेले पहायला मिळत नाहीत. तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या स्थितीवर भाष्य करताना शिंदे म्हणाले, “अजित पवारांनी आमच्यात सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर माझ्या सरकारला (भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीचा अजित पवार गट) 215 हून अधिक आमदारांचा पाठिंबा आहे. सरकारला कोणताही धोका नाही.
उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता शिंदे म्हणाले की, आम्ही लोकांसाठी काम करत आहोत. लोक ठरवतील की त्यांना त्यांच्यासाठी काम करणारा कोणी हवा आहे की फक्त घरी बसणारा. विरोधी नेत्यांना टार्गेट करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाचा वापर केला जात असल्याच्या आरोपावर विचारले असता शिंदे म्हणाले, भ्रष्ट कारभारात गुंतल्याचा संशय असलेल्यांवर ईडी कारवाई करते. ते तसे अन्य कुणाला त्रास देत नाहीत