(चिपळूण)
शहरानजीकच्या मिरजोळी, शिरळ भागात झालेल्या मारहाणप्रकरणी तब्बल १९ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेत दोघेजण गंभीर झाले असून चिपळूण पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. त्यानुसार हा गुन्हा नोंदविला आहे.
दि. १३ रोजी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास नायरा पेट्रोल पंपासमोर ही घटना घडली. याप्रकरणी काशिनाथ उर्फ कल्पेश वामन मोरे यांच्या फिर्यादीनुसार साजिद सरगुरू, कैफ शकील पेवेकर, साद पेवेकर, इरफान साबळे, राहील पेवेकर व अन्य त्यांच्यासोबत असणाऱ्या सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीनुसार मिरजोळी येथील पेट्रोल पंपाजवळील टपरीचालक मंगेश पवार व अमित निवाते यांच्याशी मोरे हे गप्पा मारत उभे होते. थोड्या वेळाने टपरीवर सिगारेट घेण्यासाठी संशयित तरुण आले व पैसे देण्यावरून टपरीचालक मंगेश पवार यांच्यात वाद चालू झाला. यावेळी साद पेवेकर याने शिवीगाळ करून धक्काबुक्की केली व अन्य आठ ते सहाजणांना बोलावून घेतले.
या सर्वांनी मिळून अमित निवाते यांना लाथाबुक्क्यांनी व दगड फेकून मारून दुखापत केली. ही हाणामारी सोडविण्यासाठी आलेल्यांना देखील मारहाण झाली. यानंतर सर्व मिळून शिरळ येथे गेले व लाथाबुक्क्यांनी व लोखंडी रॉडने घराच्या अंगणात जाऊन मारहाण केली.
याच प्रकरणी परस्परविरोधी तक्रार देखील दाखल झाली आहे. साद शकील पेवेकर याने ही तक्रार केली असून याप्रकरणी कल्पेश वामन मोरे, रणजित वसंत भडवळकर, महादेव सखाराम वाघे, अमित अरविंद निवाते, साजिद बशीर बेबल या पाचजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे मिरजोळीतील टपरीवर थांबले असता साजिद बेबल याने कैफ यास जवळ बोलावून त्याच्या कानाखाली मारली.
यावेळी कैफ याचे चुलत भाऊ राईद पेवेकर तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेल्यांना देखील शिवीगाळ करून मारहाण केली. यावेळी आरोपीने हातोडी डोक्यात घालून मारहाण केली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून दोघेजण गंभीर आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.