(पुणे)
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरती करण्यात येणार असून या पोर्टलवर आत्तापर्यंत 1 लाख 26 हजार 453 उमेदवारांनी ऑनलाईन स्व-प्रमाणपत्र भरुन नोंदणी केली आहे. उर्वरित उमेदवारांनाही नोंदणची संधी मिळावी यासाठी येत्या 22 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
शिक्षक भरतीसाठी 22 फेब्रुवारी ते 3 मार्च 2023 या कालावधीत शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात आली होती. या चाचणीला 2 लाख 39 हजार 730 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यातील 2 लाख 16 हजार 443 प्रत्यक्ष चाचणी दिली होती. ही चाचणी परीक्षा दिलेल्या उमेदवारांना 1 ते 15 सप्टेंबर या कालावधीमध्ये स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी पोर्टलवर सुविधा देण्यात आलेली आहे.
दरम्यान राज्यातील काही भागामध्ये इंटनरनेट सुविधा व्यवस्थितरित्या सुरु झालेली नाही. सर्व उमेदवारांची स्व-प्रमाणपत्र नोंदणी पूर्ण झालेली नाही. मुदतीत स्व-प्रमाणपत्र पूर्ण न करणाऱ्या उमेदवारांना शिक्षक भरती प्रक्रियेत पात्र ठरविण्यात येणार नाही. प्रमाणीकरण करीत असताना अथवा पोर्टल संदर्भात इतर कोणतीही शंका असल्यास किंवा अडचणी येत असल्यास edupavitra2022@gmail.com या ईमेल अर्ज पाठवावा लागणार आहे. त्यास उत्तरही देण्यात येणार आहे. यासाठी कोणीही कर्मचारी, अधिकारी अथवा त्रयस्थ व्यक्तीस संपर्क करु नये, असे आवाहनही शिक्षण आयुक्तालयाकडून करण्यात आलेले आहे.
पवित्र पोर्टलवरील नोंदणीचा तपशील
– अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी दिलेले उमेदवार – 2,16,443
– नोंदणी झालेले उमेदवार -1,26,453
– अपूर्ण नोंदणी -16,235
– पूर्ण पण प्रमाणित न केलेले -15,270
– प्रमाणित केलेले – 94,948
– अप्रमाणित झालेले – 684