(रत्नागिरी)
जिल्हा परिषद रत्नागिरी संचलित खानू केंद्रांतर्गत जि.प.प्राथमिक शाळा नाणीज नंबर १ येथे विद्यार्थ्यांना शालेय दैनंदिन जीवनात नेहमी लागणार्या विविध वस्तू शाळेतच उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने मुख्याध्यापक स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकारी शिक्षक मनोजकुमार खानविलकर यांच्या संकल्पनेतून विद्यार्थी वस्तुभांडारचे उद्घाटन नाणीज गावचे माजी सरपंच गौरव संसारे व पोलिस पाटील नितीन कांबळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी नाणीज ग्रामपंचायत सदस्य सौ.अनुजा सरफरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश हतपले, उपाध्यक्ष वेदिका रेवाळे, डि.जे.सामंत इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापक नूतन कांबळे, पालीतील सेवानिवृत्त शिक्षिका स्मितांजली सावंत, लायन्स क्लब हातखंबा रॉयलचे सदस्य ला.अवधुत कळंबटे, ला.शुभाली झगडे यांसह पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना शाळेत लागणार्या विविध वस्तू ना नफा ना तोटा तत्त्वावर शाळेतच उपलब्ध होणार असून, हे वस्तुभांडार शाळेतील इयत्ता चौथीचे विद्यार्थी चालवणार आहेत. त्यातून त्यांना व्यवहार ज्ञानाचा अनुभव मिळणार आहे. शाळेने राबविलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वच मान्यवरांनी कौतुक केले आहे