(रत्नागिरी)
बारसू (ता. राजापूर) येथील कातळशिल्पे संरक्षित यादीतून वगळल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चेसंदर्भात अजून कोणतेही स्पष्टीकरण शासन किंवा मंत्र्यांकडून आलेले नाही. रिफायनरी प्रकल्पासंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावर हालचाली सुरू असल्याने यादीतून वगळले असावे; परंतु याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.
राजापूरमधील कशेळी गावच्या सड्यावर असलेल्या कातळशिल्पाला राज्य संरक्षित म्हणून घोषित केले आहे. आणखी ८ कातळशिल्पांना हा दर्जा देण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे; परंतु रिफायनरीच्या वेगवान हालचाली केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू असल्याने बारसू येथील कातळशिल्पांना संरक्षित स्मारकाच्या यादीतून वगळल्याचे बोलले जात आहे. कोकणातील १७ कातळशिल्पांच्या जतनासाठी शासनाने साडेचार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पावसाळा संपल्यानंतर त्या भोवती कठडे बांधणे व इतर सुविधा निर्माण करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. बारसू गावच्या सड्यावर अनेक कातळशिल्पे आहेत. येथे रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. बारसूतील कातळशिल्पांचे नाव संरक्षित यादीतून वगळल्याचे बोलले जात आहे.
आम्ही गेली दहा वर्षे कातळशिल्प संवर्धनासाठी मेहनत घेत आहोत. बारसू कातळशिल्प यादीतून वगळण्याबाबत आमच्याकडे अद्यापतरी कोणतीही माहिती नाही. मंत्रालय स्तरावर माहिती घेऊन प्रतिक्रिया देऊ असे सुधीर रिसबूड (अभ्यासक) यांनी सांगितले