(मुंबई)
मराठा आरक्षणाच्या संदर्भात सोमवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर पत्रकार परिषदेला संबोधित करण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं एक वक्तव्य सध्या राज्यभरात व्हायरल झालं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा अर्थ काय, असा प्रश्न आता विचारला जात आहे. विरोधकांनीही यावरून शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांवर टीकेची तोफ डागली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सध्या मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय उपोषण मागे घ्यायला जरांगे पाटील तयार नसल्यानं सरकारची कोंडी झाली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी काल सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. या बैठकीतील चर्चेची माहिती देण्यासाठी एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.
मुख्यमंत्री पत्रकार परिषदेला येण्यापूर्वीच सर्व तयारी झाली होती आणि मीडियाचे कॅमेरे सज्ज होते. माइकही सुरू करण्यात आले होते. पत्रकार परिषदेच्या ठिकाणी येण्यापूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपसात बोलत होते. त्यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, आपण बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं. अजित पवारांनी त्यांना ‘एस’ म्हणत प्रतिसाद दिला. त्याचवेळी, माइक सुरू असल्याचं फडणवीसांच्या लक्षात आलं. त्यांनी खाली बसताना हळूच ही गोष्ट एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आणून दिली. मात्र, त्यांनी चेहऱ्यावर कोणताही भाव न आणता पत्रकार परिषद सुरू केली. मात्र, त्यांचं वाक्य आणि एकूण दृश्ये कॅमेऱ्यात टिपली गेली आणि व्हायरल झाली. त्यामुळं राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत खरंच गंभीर आहे का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
‘मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळ आलं तरच उपोषण सोडू अशी अट मनोज जरांगे पाटील यांनी घातली होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जालन्याला जाणार नाहीत, असं त्यांनी म्हटलं आहे. सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटलांची भेट घेईल, असं त्यांनी म्हटलं आहे.