(रत्नागिरी)
महाराष्ट्र लोकाधिकार समितीने मोठा एल्गार करत रत्नागिरीत एका बागायतदार शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली. शहरानजिकच्या टेंभ्ये गावातील खाडेवाडीत राहणाऱ्या मनोहर पांडुरंग खाडे यांच्या घराला कर्जापोटी बँकेने वर्षभरापूर्वी सील लावले होते. ते सील मंगळवारी (दिनांक १२ सप्टेंबर २०२३) मोर्चाद्वारे तोडून कुटुंबियांचा पुन्हा गृहपवेश करून घेतला. गेले दोन वर्षे या कारवाईमुळे गोठ्यात वास्तव्यास असलेल्या या कुटुंबाची आज घरवापसी करून दिली.
टेंभ्येत राहत असलेले मनोहर खाडे यांचे शेतकरी कुटुंब आहे. त्यांनी बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून आंबा व्यवसायासाठी अर्थसहाय्य घेतले होते. त्याबाबतचे केलेले व्यवहार नियमाधिन होते व आहेत. त्यानी वेळोवेळी कर्ज रकमेच्या कितीतरी अधिकपटीने परतफेडही केली होती. पण भरलेल्या रक्कमा बँकेने व्याज व इतर खर्च यामध्ये वळत्या करून मुद्दल कायम ठेवले अशी कैफियत त्यांनी महाराष्ट्र लोकाधिकारी समिती रत्नागिरी यांच्याकडे केली. त्याबाबतचे सर्व ऐवजही त्यांनी सादर केले. आंबा व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाला माझे घर तारण दाखवले ही बाब शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे. दिशाभुल करणारी माहिती देऊन अशा माहितीच्या आधारे खाडे यांच्या विरोधात एकतर्फी आदेश मिळवून त्याची अंमलबजावणी बेकायदेशीर पध्दतीने करण्याचा व त्यातुन त्यांच्या मिळकतीवर टाच आणणे खाडे यांच्यावर अन्याय करणारे आहे. हा प्रकार म्हणजे सावकारीच आहे, असे महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष ॲड प्रसाद करंदीकर यांनी सांगितले.
या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लोकाधिकार समितीचे पदाधिकारी, बागायतदार संघटना, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांची बैठक झाली. त्यात खाडे कुटुंबियांवर झालेल्या अन्यायकारक कारवाईचा निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे सारे पदाधिकारी महाराष्ट्र अध्यक्ष ॲड. प्रसाद करंदीकर यांच्या नेतृत्वाखाली टेंभ्ये येथे रवाना झाला. तेथे खाडे यांच्या घराला लावलेले सील सर्वांसमक्ष तोडण्यात येऊन खाडे कुटुंबियांची घरवापसी करण्यात आली.