(कोल्हापूर)
कोल्हापूरच्या अंबाबाई व दख्खनचा राजा जोतिबा मंदिरातील सध्याचे सुरक्षारक्षक काढून त्याजागी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे शस्त्रधारी सुरक्षा रक्षक तैनात केले जाणार होते, मात्र नव्या सुरक्षा रक्षकांना नियुक्त करण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. मंदिर ट्रस्टला जुने सुरक्षारक्षक काढून नवीन नेमणूक करण्यास दिलेली अंतरिम स्थगिती पुढील सुनावणीपर्यंत कायम असल्याचं कोर्टानं म्हटलं आहे.
महालक्ष्मी मंदिरात सध्या ४९ तर जोतिबा मंदिरात १० सुरक्षारक्षक आहेत. महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक आणि जनरल कामगार युनियनचे रक्षक या दोन मंदिरांच्या संरक्षणात आहेत. ते या मंदिराच्या सेवेत सन २०१६ पासून तैनात आहेत. या सुरक्षारक्षकांना काढून मंदिर ट्रस्टला त्यांच्या जागी आता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील शस्त्रधारी रक्षकांची नेमणूक करायची आहे. तसं पत्र त्यांनी महामंडळाकडे दिलेलं आहे. याविरोधात या सुरक्षारक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी मंदिर ट्रस्टच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला की, मंदिराला दहशतवादी हल्ल्याचा धोका आहे, आता जे सुरक्षारक्षक आहेत ते शस्त्रधारी नाहीत. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे सुरक्षारक्षक शस्त्रधारी आहेत. त्यामुळे जुने सुरक्षारक्षक काढून महामंडळाच्या शस्त्रधारी रक्षकांची नेमणूक करण्यात येत आहे, असा युक्तिवाद ट्रस्टच्या वतीनं केला गेला आहे.
मंदिराच्या या निर्णयला याचिकाकर्त्यांनी विरोध केला आहे. आता जे मंदिराची सुरक्षा बघतात त्यांची नेमणूक भाविकांना रांगेतून सोडण्यासाठी आणि त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी करण्यात आली आहे. परिणामी त्यांना सेवेतून काढता येणार नाही, असा दावा याचिकेतून केला गेला आहे. याची नोंद करून घेत हायकोर्टानं ट्रस्टला जुने सुरक्षारक्षक काढून नवीन नेमणूक करण्यास अंतरिम मनाई केली आहे. मात्र जुने सुरक्षारक्षक न काढता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या शस्त्रधारी रक्षकांची नेमणूक करू शकता, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.