रत्नागिरी : आद्य श्रीशंकराचार्य यांचे प्रातः स्मरण स्तोत्र हे निर्गुणाचे स्तोत्र आहे. आत्मा, परमात्मा हे निर्गुण तत्त्व असल्याने वस्तुतः त्याची स्तुती होऊ शकत नाही. निराकार आत्मतत्त्व शब्दातीत असले तरी त्याची साधना करावी, असे प्रतिपादन डॉ. ज्योत्स्ना पाटणकर यांनी केले. देवरुख व रत्नागिरीतील विठ्ठल मंदिरातील प्रवचन मालिकेत त्या बोलत होत्या.
श्री ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमात या प्रवचनमालेला सुरवात करण्यात आली. डॉ. पाटणकर यांनी वेदांत शास्त्रातील संकल्पना आणि दृष्टांत देऊन अत्यंत सोप्या भाषेत स्तोत्राचा हा विषय तीन दिवसात उलगडून सांगितला. दोन्ही ठिकाणच्या प्रवचनांना ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच जिज्ञासूंची गर्दी झाली होती. कोरोना नियम पाळून हा उपक्रम राबवण्यात आला. सुरवातीला शंकराचार्यांचे प्रातःस्मरणस्तोत्र आणि समारोपाला निर्वाणषटक सौ. शुभदा पटवर्धन यांनी सादर केले.
विठ्ठल मंदिरामध्ये नीला पालकर, ज्योत्स्ना पाटणकर आणि सहकारी मैत्रिणीनी मिळून प्रवचनांचा उपक्रम सुमारे पाच वर्षे चालवला होता. कोरोना काळात त्यात खंड पडला. आता हा उपक्रम रत्नागिरीसह देवरुख येथे नव्याने सुरू झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ. गौरी ढवळे यांनी केले. डॉ. करमरकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाछी विठ्ठल मंदिर देवस्थान, अध्यक्ष आनंद मराठे, विजय पेडणेकर, प्रमोद रेडीज, खल्वायन संस्थेचे श्रीनिवास जोशी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे नियोजन डॉ. निशिगंधा पोंक्षे, सौ. गौरी ढवळे, सौ. वेदा प्रभुदेसाई, शुभदा पटवर्धन, मुग्धा भावे यांनी नियोजनासाठी मदत केली. देवरुखमध्येही ज्योत्स्ना पाटणकर यांनी याच विषयावर प्रवचने दिली. या प्रवचनांचे आयोजन वेदा प्रभुदेसाई यांनी केले होते.
पुढील महिन्यातही प्रवचन होणार आहे. १७ ते १९ जानेवारी २०२२ दरम्यान रत्नागिरीत आणि २० ते २२ जानेवारीदरम्यान देवरुख येथे बुलढाणा येथील अभ्यासू व्यक्तीमत्व सौ. माधुरी जोशी या भगवद्गीता अध्याय १६ वा दैवी संपत्ती या विषयावर प्रवचन देणार आहेत. सायंकाळी ५ ते ६ या वेळेत दोन्ही ठिकाणी कार्यक्रम होईल.