(रत्नागिरी)
महिला ग्राहकाच्या आधारकार्डमध्ये फेरबदल करून बनावट कागदपत्रांच्या आधारे बजाज फायनान्स कंपनीतून १ लाख १० हजारांचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. हा प्रकार आष्टा ( जि. सांगली ) व रत्नागिरीतील शाखेत घडला असून याप्रकरणी सुशांत अशोक कोडोलकर याच्याविरोधात रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूकीच्या पैशातून त्याने मोबाईल घेतला आहे. याप्रकरणी राहुल बबन पाटील यांनी फिर्याद दिली आहे .
सुशांत कोडोलकर हा रत्नागिरीतील बजाज फायनान्स कंपनीत पूर्वी कामाला होता. त्याला सध्या कंपनीतून बडतर्फ करण्यात आले. या कंपनीतील एका जुन्या महिला ग्राहकाच्या आधारकार्डवरील मूळ पत्त्यावरील जिल्हा व पिनकोड बदलून सुशांत याने त्या ठिकाणी सांगली जिल्हा व पिनकोड ४१६३०१ असा टाकला. त्यानंतर त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे आष्टा ( जि . सांगली ) येथील एका मोबाइल दुकानातून १ लाख १० हजारांचा किमतीचा मोबाइल खरेदी करण्यासाठी त्याने स्वतःचे आयडी वापरून १ लाखाचे कर्जप्रकरण केले.
त्याचे दोन हप्ते त्या महिलेच्या बँक खात्यातून कट झाले. बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याने हे कर्जप्रकरण केल्याचे लक्षात येताच बजाज फायनान्सचे राहुल पाटील यांनी फसवणूकीची तक्रार दिली. या तक्रारीत त्यांनी सुशांत कोडोलकर याने स्वतःचा आयडी वापरून १ लाख १० हजारांचे कर्ज घेऊन बजाज फायनान्स कंपनीची व महिला ग्राहकाची फसवणूक केल्याचे म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी सुशांत कोडोलकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे