(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवास भाडे आकारणीबाबत अनेक तक्रारी येत असून अनेकवेळा सणासुदीला अनेक ठिकाणी प्रवाशांची लुटमार होत असते. तसेच अनेक ठिकाणी मीटर सुरू नाहीत. याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना वेळो वेळी निवेदने, अर्ज दाखल करण्यात आले होते. त्याच प्रमाणे जवळ जवळ 80 ते 90 टक्के गाड्यांना चायना, व अनधिकृत हेड लाईट लावले गेले आहेत. त्याचा प्रखर लाईट समोरील वाहनांवर पडून अपघाताची शक्यता असते. तसेच रस्त्यांची दुरवस्था पाहता अशा लाईट मुळे रस्त्यावर काहीच दिसत नाही. परंतु शासनाच्या अनास्थे मुळे उपाययोजना करण्यात आलेली नाही. रात्रीचे वेळी चेक नाके नाहीत. खाजगी बसेस मध्ये प्रवाशांना शासनाने ठरविलेल्या आवश्यक असलेल्या सुविधा नाहीत. रिक्षा, खाजगी बसेसमध्ये भाडे दरपत्रक लावण्याबाबत पत्र व्यवहार करण्यात येऊनही त्यावर योग्य कार्यवाही करण्यात आलेली नाही.
दरपत्रकाबाबत फक्त रत्नागिरी तालुक्यासाठी मर्यादित प्रसिद्धी झाली आहे. दरपत्रक रिक्षा व खाजगी बसेसमध्ये लावणे अनिवार्य आहे, अशी प्रवाशी वर्गाची मागणी आहे. त्याचप्रमाणे परिवहन कार्यालयाकडून प्रसिद्धी पत्रकाद्ववारे भाडेपत्रक बाबत प्रसिद्धी का दिली जात नाही? गणपती सण जवळ आला असून काही भरमसाठ भाडे आकारणी होण्याची शक्यता आहे. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रवाशांचे हित लक्षात घेऊन कडक पाऊले उचलणे आवश्यक आहे. याबाबत मुख्यमंत्री महोदय, परिवहन मंत्री महोदय, जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन सदर करण्यात येणार आहे, असे सामाजिक कार्यकर्ते व माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य चे संगमेश्वर तालुका अध्यक्ष मनोहर गुरव यांनी सांगितले आहे