(नवी दिल्ली)
भारतीय बॉक्सिंग टीमने मुस्तफा हजरुलाहोविक मेमोरियल स्पर्धत घवघवीत यश मिळवले आहे. भारताच्या पारड्यात एकूण १० पदके पडली आहेत. मंजू रानीला स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळाले असून अन्य आठ भारतीय स्पर्धकांनाही प्रथम पारितोषिक मिळाले आहेत. रविवारी या स्पर्धेची सांगता झाली.
५० किलो वजनाच्या महिला गटात मंजू रानीने आपल्या उत्तम खेळाचे प्रदर्शन केले. तिने अफगाणिस्तानच्या सादीया ब्रोमांड हिचा ३-० अशा फरकाने पराभव केला. तिच्या दिमाखदार कामगिरीने तिला सुवर्ण पदक तर मिळालेच पण सर्वोत्कृष्ट बॉक्सरची उपाधी देखील मिळाली.
५१ किलो गटात बरुन सिंग शागोलशेम याने पोलंडच्या जॅकब स्लोमीन्सकचा ३-० असा पराभाव करत पदकावर नाव कोरले. ५७ किलो वजनी गटात अक्षय कुमारला स्वीडनच्या हल्डी हाड्रोसने चांगली टक्कर दिली. पण, शेवटी अक्षय कुमारने स्वीडनच्या स्पर्धकाचा २-१ ने पराभव केला.
९१ किलो वजनी गटात नवीन कुमार विजयी झाला. त्याने चुरशीच्या लढतीत पोलंडच्या माटेईझ बेरेनिस्कीचा २-१ अशा फरकाने पराभव केला. ६३ किलो वजनी गटात मनिश कौशिकने एकहाती विजय मिळवला. त्याने पॅलेस्टिनच्या मोहम्मद सोद याचा ३-० अशा सफाईने पराभव केला. ज्योती, शशी, जिग्यासा, विनाक्शी आणि सतिश कुमार यांनाही विरोधी स्पर्धक न आल्याने विजयी घोषित करण्यात आले. त्यामुळे भारतीय स्पर्धकांचा मुस्तफा हजरुलाहोविक मेमोरियल स्पर्धत दबदबा निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.