(संगमेश्वर / प्रतिनिधी)
नदीपात्रात पोहताना बुडणाऱ्या भावाला वाचविताना दोन सख्खे भाऊ बुडल्याची दुर्दैवी घटना रविवारी संगमेश्वरातील सप्तलिंगी नदीपात्रात दुपारी घडली. हे दोघे पूर या गावातील असून, मोठा भाऊ गणेश रामचंद्र झेपले (३७) याचा मृतदेह सापडला आहे, तर दुसरा भाऊ सचिन याचा शोध सुरू आहे.
सचिन रामचंद्र झेपले (३२) हे पत्नीसमवेत सप्तलिंगी या नदीपात्रात गेले होते. सचिन यांची पत्नी सप्तलिंगी चिऱ्याचा कोंड या ठिकाणी कपडे धुवत असताना सचिन नदीपात्रात पोहायला उतरले होते. तो पोहत असताना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडू लागले. पती बुडत असल्याचे पाहून घाबरलेल्या पत्नीने धावत जाऊन दिर गणेश यांना माहिती दिली. झेपले यांच्या घरापासून चिऱ्याचा कोंड हे अंतर ३०० मीटर एवढे आहे. लहान भावाला वाचवण्याकरिता गणेश झेपले याने धावत येऊन सचिन बुडालेल्या ठिकाणी पाण्यात उडी मारून शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात गणेशही बुडाला.
ही घटना ग्रामस्थांना कळल्यानंतर त्यांनी घटनास्थळाकडे जात पोलिसांना माहिती दिली. देवरूखचे पोलिस निरीक्षक प्रदीप पोवार यांनी सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी धाव घेतली. याबरोबरच तहसीलदार अमृता साबळे, मंडल अधिकारी सुधीर यादव, तलाठी बी. ए. तायडे तत्काळ दाखल झाले.
ग्रामस्थांनी दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुमारे ४:४५ वाजण्याच्या सुमारास गणेश झेपले यांचा मृतदेह सापडला. देवरूख ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. सचिन यांचा शोध सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता. सचिन यांना दोन लहान मुली आहेत, तर गणेश हा अविवाहित असल्याची माहिती उपलब्ध होत आहे.