(चिपळूण)
आयशर ट्रक व दुचाकीमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. संबंधित तरुण चिपळूण आगारात एसटी चालक म्हणून कार्यरत आहे. विशाल शंकर शिंदे (३५, रा. पाटण, सध्या कापसाळ, चिपळूण) असे त्याचे नाव आहे. हा अपघात चिपळूण शहरातील पागनाका येथे शुक्रवारी (८ सप्टेंबर) सायंकाळी ७ वाजता झाला.
देवगडहून मुंबईकडे निघालेल्या आयशर ट्रकची पागनाका येथे समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक बसली. यामध्ये विशाल शिंदे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, तो जागीच बेशुद्ध पडला होता. त्याला तत्काळ कामथे रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा पंचनामा उशिरापर्यंत सुरू होता. कापसाळ येथील यामा शोरूम नजीक राहणारे विशाल शिंदे हे चिपळूण आगारात एसटी चालक म्हणून काम करतात.