जाकादेवी वार्ताहर :
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयामध्ये भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६५ वा महापरिनिर्वाण दिन व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुण्यस्मरण दिन संयुक्तरीत्या प्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी प्रमुख व्याख्याते महेश राडे यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र व देश उद्धारक महान कार्य यावर अभ्यासपूर्ण प्रभावीपणे भाष्य केले. तर प्रशालेतील ज्येष्ठ कलाध्यापक तुकाराम दरवजकर यांनी क्रांतीसुर्य महात्मा फुले यांनी विश्व समतेसाठी, विश्वबंधुत्वासाठी शिक्षण कसे महत्त्वाचे आहे तसेच शिक्षणाचे महत्त्व आणि सामाजिक परिवर्तनात महात्मा फुले यांचे महान योगदान भाषणातून काही बोलके प्रसंग कथन करून महामानवाला वंदन केले. अध्यक्षीय विचार मुख्याध्यापक बिपीन परकर यांनी मांडले. महापुरुषांचे विचार अंगीकृत करणे काळाची गरज असून त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आपणही इतरांसाठी काहीतरी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्यास अशा महामानवांना खरी आदरांजली ठरेल असे मत अध्यक्षीय विचारातून श्री. परकर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत, सूत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख संतोष पवार यांनी तर आभार सुशांत लाकडे यांनी मानले. यावेळी शिक्षक प्रतिनिधी अनिल पाटील, शिवानंद गुरव, शशिकांत लिंगायत यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रारंभी मानवतेचे पुजारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आले.