( संगलट-खेड / इक्बाल जमादार )
चिपळूणचे माजी नगरसेवक, नगरपरिषदचे माजी आरोग्य सभापती आणि एकेकाळचे अभ्यासू पत्रकार राहिलेले शशिकांत मोदी यांची ठाकरे गट शिवसेनेच्या चिपळूण शहरप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. याबद्दल श्री. मोदी यांचे अभिनंदन होतं आहे. ही निवड दैनिक सामना मधून जाहीर करण्यात आली आहे.
जनमानसात विकासकामांच्या माध्यमातून वलय निर्माण केलेले, प्रसन्न व्यक्तिमत्त्व लाभलेले आणि श्री स्वामी समर्थ यांचे परम भक्त म्हणून शशिकांत मोदी यांच्याकडे पाहिले जाते. चिपळूण पालिकेत सलग तीन वेळा नगरसेवक होण्याची किमया त्यांनी साधली आहे. आता शिवसेनेचे दोन गट झाले आहेत. माजी शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी शिंदे गटात काही दिवसांपूर्वीच प्रवेश केला असून त्यांनी शहरातील ठाकरे गटाचे पदाधिकारी- कार्यकर्ते यांना आपल्या सोबत घेण्याचा धडाका सुरू केला आहे. त्यामुळे ही गळती रोखण्यासोबतच पक्षाला पुन्हा उभारी देण्याचे आव्हान शशिकांत मोदी यांच्या समोर असणार आहे. हे ‘शिवधनुष्य’ ते कसे पेलण्यात ते यशस्वी होतात का? हे पुढील काळात स्पष्ट होणार आहे. मोदी यांचा लोकाकडे चांगला जनसंपर्क असल्याने ग्रामस्थही त्यांना सहकार्य करतील असे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.