(संगमेश्वर / प्रतिनिधी)
कोकणातील अग्रगण्य कलामहाविद्यालय सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डे हे चित्र-शिल्प कलामहाविद्यालय नवनविन शैक्षणिक उपक्रम राबवून मुलांच्या सर्वांगिण विकासाला चालना कशी मिळेल या साठी प्रयत्न करत असते. यासाठी चित्रकार शिल्पकारांची प्रात्यक्षिके, नामवंत व्यक्तींची व्याख्याने, कला प्रदर्शने, शैक्षणिक सहल, कार्यशाळा असे विविध कार्यक्रम राबविण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून आज ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकार विनायक परब यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते .
५ सप्टेंबर रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा करण्यात येतो. शिक्षक दिन हा आपल्या जीवनातील शिक्षक आणि गुरुच्या स्थानी असलेल्या व्यक्तींना आदर देण्यासाठी साजरा करतात. त्यांच्यामुळे तुमच्या जीवनावर झालेला प्रभाव किंवा विशिष्ट क्षेत्र किंवा समुदायासाठी त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल कौतुक करण्याचा हा एक प्रसंग शिक्षक दिनाचे औचित्य साधून सह्याद्रि स्कूल ऑ आर्ट मधे ज्येष्ठ पत्रकार विनायक परब यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
पत्रकार विनायक परब यांनी यावेळी बोलताना कलेच्या भविष्याकाळातील संधी कोणत्या असतील तसेच रंगांच्या संवेदना, रंगाविषयी माहिती ,रंगशास्त्र, रंगांचे विज्ञान याविषयी खूप उत्स्फूर्तपणे आपले विचार विद्यार्थ्यांपुढे मांडले. विद्यार्थ्यांच्या अनेक कलेविषयी असणार प्रश्नांचे निरसन त्यांनी केले. त्याचबरोबर आर्टिफिशियल इंटिलिजन्ट याचा उपयोग आपल्या कलेत किती प्रमाणात केला पाहिजे ? याचे मार्गदर्शन केले. येथील विद्यार्थ्यांची कामे व कला महाविद्यालय पाहून त्यांनी समाधानकारक उत्स्फूर्त अभिप्राय देखील दिला.कलामहाविद्यालयातर्फे त्यांचा पुष्प गुच्छ, शाल,श्रीफळ तसेच चित्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी कलाशिक्षकांचे पुष्प देऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.व प्रत्येक वर्गांवर विविध विषयांचे पाठ घेऊन शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.