राजापूर : गेल्या पाच वर्षांच्या आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीची झालेली सर्वांगिण प्रगती ही आकडयांच्या आणि अहवालाच्या रूपाने सर्वांसमोर ठेवलेली आहे. ही प्रगती सभासदांचा, ठेवीदारांचा पतपेढीवर आणि संचालक मंडळावर असलेला विश्वास आणि संचालक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे, निष्ठेने केलेल्या कामाचे द्योतक आहे. त्यामुळे पतपेढीची प्रगती ही आभास नसून विरोधकांसाठी चपराक आहे अशा शब्दात राजापूर तालुका कुणबी पतपेढीचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांनी विरोधकांना फटकारले आहे.
विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपत असून लवकरच कुणबी पतपेढीचा निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमिवर राजापूर तालुका कुणबी पतपेढीचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत सन २०१५-१६ ते २०२०-२१ या पाच वर्षातील प्रगतीचा आढावा मांडला. यावेळी त्यांनी संस्थेने पाच वर्षात साधलेली आर्थिक प्रगती, कार्यविस्तार याविषयीची सविस्तर माहिती दिली.
गेली पाच वर्षे सहकार क्षेत्राशी आणि आर्थिक संस्थांसाठी कसोटीचा काळ होता. सुरूवातील नोटबंदी, जीएसटी धोरण, कोरोना संकट त्यामुळे बाजारात आलेली मंदी, वाढती स्पर्धा या सर्वांवर मात करीत ग्रामिण कार्यक्षेत्र असलेल्या कुणबी पतपेढीने चौफेर प्रगती साधली आहे. या पाच वर्षाच्या कालखंडात संस्थेच्या पाच नव्या शाखा सुरू करताना संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण रत्नागिरी जिल्हा झालेले आहे. त्यामुळे आणखी चार नव्या शाखांना मंजूरी मिळाली असून लवकरच सापुचेतळे, भांबेड, साखरपा आणि पाली या ठिकाणी येत्या काळात या चार शाखा कार्यान्वीत होणार असल्याची माहिती मांडवकर यांनी दिली.
राजापूर तालुका कुणबी पतपेढीही आर्थिक संस्था आहे. संस्था चालविताना सर्व प्रकारची सोंग आणता येतात मात्र पैशाचे सोंग आणता येत नाही. त्यामुळे एखाद्या आर्थिक संस्थेचा अहवाल हा त्या पतसंस्थेचा आरसा असतो. त्यामध्ये आकडयांचा घोळ करता येत नाही. त्यामुळे कुणबी पतपेढीची झालेली प्रगती आभास आहे असे म्हणणे म्हणजे विरोधकांच्या बुध्दीची किव करावी तेवढी कमी आहे. ३१ मार्च १६ अखेर पतपेढीची सभासद संख्या ७४०२ एवढी होती, त्यामध्ये २९८८ इतके सभासद वाढ झाली असून आता १०३९० इतकी सभासद संख्या आहे. वसुल भागभांडवल ९२ लाख ९४ हजार होते. त्यामध्ये पाच वर्षांत १ कोटी २८ लाख ३९ हजारांची वाढ झाली आहे. निधी १ कोटी ३४ लाख ७ हजार वरून ३ कोटी ९ लाख ४४ हजारावर पोहचला आहे. ठेवींमध्ये २६ कोटी २० लाख २० हजारांनी वाढ होवून ३ कोटी ९ लाख ४४ हजार पर्यंत पोहचल्या आहेत. पाच वर्षात कर्जव्यवहारांमध्ये वाढ झाल असून पाच वर्षात १८ कोटी ५५ लाख ९८ हजार नेवाढ झाली आहे. कर्जवसुलीमध्ये सातत्य राखताना हे प्रमाण ९८.७६ टक्के राहिले आहे. त्यामुळे कायमच संस्थेला अ ऑडीट वर्ग मिळताना ढोबळ एनपीए १०.०३ टक्कांवरून १.३८ टक्के वर आणण्यात आणि निव्वळ एन. पी. ए. ९.०८ टक्के वरून शुन्य टक्क्यावर आणण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. गेल्या पाच वर्षात संस्थेचा एकत्री व्यवसाय हा २३ कोटी ९३ लाखाने वाढून तो आता ६८ कोटी ६९ लाख ७४ हजार इतका झाला आहे. तर संस्थेचे खेळते भागभांडवल १७ कोटी ४२ लाख ११ हजारावरून ४६ कोटी ९१ लाख १२ हजारावर पोहचले असल्याचे मांडवकर यांनी सांगितले.
नव्याने काढलेल्या पाचही शाखा नफ्यात असून ग्रामिण कार्यक्षेत्र असतानाही आधुनिकता आणि पारदर्शकता याचा मेळ घालून संस्थेने आजवरची यशस्वी वाटचाल केली आहे. ही पतपेढी गोरगरीब सर्वसामान्य सभासदाची आहे याची जाण कायमच ठेवून आम्ही पाच वर्षे कारभार केलेला आहे. मनमानी कारभार केला असता तरी ही पतपेढीची प्रगती झाली असती का? याचा विचार सर्वसामान्य सभासदांनी केला पाहिजे. पतपेढीच्या कोणत्याही व्यवहाराविषयी कधीही पतपेढीत यावे शकांचे निरसन केले जाईल. मात्र वैयक्तिक आकसापोटी वेगवेगळया मार्गाने पतपेढीची बदनामी करण्याचे षडयंत्र काही मंडळी करीत आहेत. त्यानी पतपेढीची बदनामी करून कधीच मोठ होता येणार नाही याची जाणीव ठेवावी. आपल्या विरोधात जे बिनबुडाचे आरोप केले जात आहेत त्यावर योग्य वेळी योग्य ते उत्तर दिले जाईल आणि प्रसंगी कायदेशीर कारवाईचाही मार्ग अवलंबीला जाईल असा ईशाराही मांडवकर यांनी दिला आहे.
ही पतपेढी ही कुणबी समाजातील धुरीणांनी उभी केली आहे. समाज हित हा केंद्रबिंदू मानून या पतपेढीचा कारभार चालतो. त्यामुळे आजवर या पतपेढीवर सर्वमताने बिनविरोध संचालक निवडून देण्याची परंपरा आहे. आगामी निवडणुकीतही हा शिरस्ता पाळला जाईल असा विश्वास मांडवकर यांनी व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेला संस्थेचे उपाध्यक्ष बाळ तांबे, संचालक तुकाराम भिकणे, अशोक तोरस्कर, सौ. स्मिता पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पाटकर, वसुली अधिकारी श्रीकांत राघव आदी उपस्थित होते.