जी अनंत ब्रम्हांड घडवते, जी लीला विनोद निर्माण करते, जी आदिपुरुषांमध्ये दडी मारून बसते, जी प्रत्यक्ष पाहिले तर आढळते परंतु विचार केला तर दिसत नाही. जिचा पार ब्रह्मादीकालाही लागत नाही. जी सर्व सृष्टी रूप नाटकाची सूत्रधात्री आहे. एकोहम या निर्मल जाणिवेची स्फुर्ती आहे. जिच्यामुळे स्वानंद सोहळा, ज्ञान शक्ती आहे. जी लावण्यस्वरूपाची शोभा आहे. जी परब्रम्हसूर्याची प्रभा आहे. जी नेतीनेती या शब्दाने वर्णन करावी लागते. जिच्यामुळे संसार नष्ट होतो, जी मोक्षश्री, महामंगल अशी मोक्षरुपी संपत्ती जिच्यामुळे मिळते, जी सतरावी जीवनकला आहे, जी सत्वशील, सुशीतल, लावण्यखणी आहे. जे अव्यक्त पुरुषाची व्यक्त होणारी अभिव्यक्ती आहे. जीच्या विस्तारामुळे इच्छाशक्ती वाढते. जी कलीकाळाचे नियंत्रण करणारी सद्गुरू कृपा म्हणजे सरस्वती. जी परमार्थमार्गाचा विचार निवडून, सारअसार दाखवते, आपल्या शब्दाच्या बळाने भवसिंधू पैलपार करते. अशी अनेक वेशांनी नटलेली, एकमेव शारदा माया आहे. ती सिद्धांच्या अंतरामध्ये साठलेली आहे. परा पश्यन्ति मध्यमा आणि वैखरी या वाणींच्या रूपाने ती वास करते. तिने वैखरी रूपाने प्रगट केले आहे म्हणून जितकं कर्तृत्व करतो ते सगळं शारदेच्या गुणांमुळे झालं असं म्हणतात.
जी ब्रह्मादिकांची जननी आहे, जिच्यामुळे हरिहर निर्माण झाले, तिन्ही लोक आणि सृष्टी रचनेचा विस्तार जिच्यामुळे झाला, जी परमार्थाचे मूळ आहे, किंवा केवळ सद्विद्या आहे, अशी ती निवांत निर्मल, निश्चल स्वरूपस्थिती आहे. जी साधकांच्या चिंतनामध्ये असते, जी सिद्धांच्या अंतकरणांमध्ये समाधीरूपाने वास करते, जी निर्गुणाची ओळख आहे, जी अनुभवाची खूण आहे, जी सर्व घटनांमध्ये व्यापकपणे सर्वत्र व्यापून आहे. शास्त्र पुराण वेद श्रुती जिचे अखंड स्तवन करतात. नाना रूप असलेल्या शारदेचे सर्व प्राणिमात्र स्तवन करतात. जी वेदशास्त्रांच्या महिमा आहे. जी निरूपमाची उपमा आहे. जिच्यामुळे परमात्मा हे नाव संभवते. अशी नाना विद्या, कला, सिद्धी, नाना निश्चयाची बुद्धी, केवळ जाणीवमय सूक्ष्म वस्तूची शुद्धी तीच आहे. जी हरिभक्तांची भक्ती, अंतरनिष्ठांची अंतरस्थिती, जी जीवनमुक्तांची मुक्ती, अशी सायुज्यता आहे. जी अनंत माया वैष्णवी आहे. जी थोरथोरांना मी ज्ञाता या अभिमानामुळे गुंतवते, जे जे डोळ्यांनी पाहिले ते ते शब्दांनी ओळखले. जे जे मनाला भासले तितके सगळे तिचे रूप आहे. स्तवन, भजन, भक्तीभाव मायेवाचून नाही ठाव या वचनाचा अभिप्राय अनुभवी लोक जाणतात; म्हणून थोराहून थोर असलेल्या ईश्वरांचा ईश्वर असलेल्या या शारदेस माझा नमस्कार. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे शारदा स्तवन नाम समास तृतीय समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.
दशक १ समास ४ सद्गुरू स्तवन नाम समास
जिथे माया स्पर्शू शकत नाही ते सद्गुरूचे स्वरूप अज्ञानी अशा मला कसे कळणार? ते वर्णन करता येणार नाही. वेद देखील नेती-नेती, कळत नाही.. कळत नाही असे म्हणतात असे असताना माझ्यासारख्या मूर्खाची मती तिथपर्यंत कशी पोहोचेल? हे मला समजत नसल्याने मी गुरूना दुरूनच नमस्कार करतो. हे गुरुदेवा मला पैलपार करा. आपले स्तवन करता येत नाही, मायेचा भरोसा वाटत नाही तरी आता करील तशी स्तुती हे सद्गुरु स्वामी आपण स्वीकारा. मी आपले स्तवन करीन असे मायेच्या बळावर म्हणत होतो परंतु मायाच लज्जायमान झाली आहे, आता काय करू? मुख्य परमात्मा सापडत नाही म्हणून त्याची प्रतिमा करावी लागते त्यामुळे मायेच्या सहाय्यानेच सद्गुरुचे वर्णन करीत आहे.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127