(रत्नागिरी /प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित रत्नागिरी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभेत विद्यमान अध्यक्ष विलास जाधव अनेक प्रश्नांवर अडचणीत आल्याने निरुत्तर झाले. त्यामुळे सत्काराच्या कार्यक्रमा नंतर चर्चेविना वार्षिक सभा गुंडाळण्याची नामुष्की सत्ताधारी संचालक मंडळावर आली.
प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या विद्यमान व्यवस्थापक मंडळाची मुदत १० मे २०२२ रोजी संपुष्टात आली आहे. यानंतर संस्थेच्या चिपळूण बांधकामावर सुमारे ५ कोटी रक्कम खर्च करण्यात आली आहे. चिपळूण शाखेसाठी जमीन खरेदी व इमारत बांधकाम आणि अनुषंगिक बाबीवर जवळपास आठ कोटी इतकी भरमसाठ रक्कम खर्च करण्यात आली असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला आहे. चिपळूण जागा खरेदी, इमारत बांधकाम याची सखोल चौकशी करून त्याबाबत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सभागृहात लावून धरण्यात आली. यासाठी व्यवस्थापक मंडळ सभा इतिवृत्त दाखले सभागृहात सादर करताच सारे सभागृह अवाक झाले.
सभेची अपुरी विषय पत्रिका, चिपळूण बांधकाम गैरव्यवहार, लांजा शाखेच्या बांधकामाकडे निधी अभावी दुर्लक्ष, खेड शाखेची रखडलेली जागा खरेदी, चिटणीस खडपे राजीनामा व कर्ज प्रकरण आदी विषयावर अध्यक्ष विलास जाधव यांना कोणतीच उत्तरे देता आली नाहीत. विविध विषयांवर झालेल्या गदारोळात विद्यमान अध्यक्ष विलास जाधव यांनी भोजनासाठी सभा तहकूब केली व मध्यंतर घेतला. त्यानंतर सभा चालवणे अशक्य असल्याचे लक्षात येताच वार्षिक अधिमंडळच्या विषय पत्रिकेतील विषय क्रमांक ५ ते १६ हे महत्त्वाचे व आर्थिक कारभाराचे विषय भोजन मध्यंतरा नंतर प्रचंड गदारोळ, गडबड गोंधळात अवघ्या ५ मिनिटात कोणत्याही प्रकारची चर्चा न करता संपविण्यात आले. त्याला बहुसंख्य सभासदांनी नामंजुर केले आहे. याचे संपूर्ण सभेचे व्हिडीओ चित्रीकरण उपलब्ध आहे.
संस्थेच्या राखीव निधीतून उचल करून स्वमालकी संस्था कार्यालय उभारणी नावाखाली इमारती बांधल्या जात आहेत. या इमारतींचा वापर भाड्याने देण्यासाठी केला जात आहे. त्यातून मिळणारे उत्पन्न व इमारत खर्च , वीजबिल, अनुषंगाने येणारे कर, मेंटेनन्स हा ताळमेळ पाहता संस्थेला बांधकाम करून नुकसान सहन करावे लागणार आहे, यावर सभासदांनी आवाज उठवला.
बांधकामे गैरव्यवहार याचे खापर विरोधी संचालकांच्या माथी मारण्यासाठीच एकमेव विरोधी संचालक विलास जाधव यांना पतपेढीच्या अध्यक्ष पदावर बसवण्याची बुजुर्ग सत्ताधारी संचालकांची धूर्त खेळी यशस्वी झाल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होत आहे. यामुळे विनाकारण आपल्या घरच्या मैदानावर अध्यक्ष विलास जाधव यांना धोबीपछाड मिळाला.
संस्थेचा कारभार हा ठराविक संचालक मनमानीपणे हाकत असून त्यामुळे सभासदांच्या हिताकडे दुर्लक्ष होत आहे. कोट्यवधी रुपये जागा खरेदी व बांधकाम यात उधळपट्टी केली जात आहे. त्यामुळे संस्थेचे मुदत संपलेले व्यवस्थापक मंडळ तात्काळ बरखास्त करून स्थगित झालेली निवडणूक तात्काळ घेण्यात यावी, अशी मागणी सभासदांकडून करण्यात येत आहे.