(जालना)
जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू असताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर आंदोलक संतापले. बघता बघता आंदोलनाचे लोण इतर भागात पसरले. त्यानंतर काही ठिकाणी दगडफेक, जाळपोळ करण्यात आली. मराठा आरक्षण आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जविरोधात राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. या धुमश्चक्रीत 15 आंदोलक जखमी झाले. तर अंतरवाली सराटी या गावातील आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत सुमारे 50 पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींवर नजिकच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शांततेचे आवाहन करून या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आक्रोश मोर्चाच्या 10 कार्यकर्त्यांनी 29 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू केले होते. 2 दिवसांपूर्वी स्वतः मुख्यमंत्र्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली होती. पण त्यातून काहीच मार्ग निघाला नाही. आंदोलनकर्ते उपोषणावर ठाम होते. आज उपोषणादरम्यान आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती बिघडली. सायंकाळी 6.30 वाजता पोलिसांचा मोठा फौजफाटा उपोषणस्थळी आला. त्यांनी जरांडे-पाटील यांना बळाचा वापर करून अॅम्ब्युलन्समध्ये टाकून नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे उपस्थित असलेले आंदोलक गावकरी चिडले आणि त्यातील काहींनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच दोन राऊंड हवेत गोळीबार केला. या धुमश्चक्रीत 12 पोलीस व 15 आंदोलक जखमी झाले. त्यानंतर गावात संचारबंदी लावण्यात आली. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले.
या घटनेची माहिती सर्वत्र पसरताच इतर ठिकाणीही त्याचे तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली. सुरुवातीला घटनास्थळापासून 15 किमी अंतरावर असलेल्या धुळे- सोलापूर मार्गावर 4 खासगी बसेस पेटवण्यात आल्या तर इतर 15 वाहनांची तोडफोड करण्यात आली. पोलिसांच्या दाव्यानुसार ग्रामस्थांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. विरोधकांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला असून, याला पूर्णपणे सरकार जबाबदार असल्याचे म्हटले आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले की, या संपूर्ण घटनेची गावकर्यांनी फोनवरून मला माहिती दिली आहे. पोलिसांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर बळाचा वापर केल्यामुळेच ही घटना घडली. त्यामुळे या घटनेला सरकार जबाबदार आहे. पोलिसांनी कोणाच्या आदेशावरून लाठीमार केला? राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शनिवारी जालना दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी ते अंतरवाली सराटी गावी जाणार असून जखमी आंदोलकांची भेट घेण्याची शक्यता आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण नाकारल्यानंतर सरकार दीड वर्ष काय करीत होते. ‘आम्हाला आरक्षण देणार की लाठ्या देणार’ असा सवाल मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई लढणारे विनोद पाटील यांनी केला आहे.
दरम्यान या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ते म्हणाले की, झालेली घटना दुर्दैवी आहे. मी स्वतः जालन्याचे पोलीस अधीक्षक आणि कलेक्टरशी बोललो. त्यांनी सांगितले की, आम्ही जरांडे-पाटील यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना तिथे असलेल्या आंदोलनकर्त्यांनी गदारोळ केला. त्यामुळे पुढील दुर्दैवी प्रकार घडला. सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात रिव्ह्यू पिटिशन दाखल केले आहे. चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षतेखालील उपसमिती सर्व बाजूंचा अभ्यास करीत आहे. मात्र, मराठा समन्वयांनी शांतता राखून सरकारला सहकार्य करावे.
जालन्यातील घटना दुर्दैवी आहे. लाठीमारात कुणीही गंभीर जखमी होऊ नये याची काळजी घेण्यात आली होती. जर लाठीचार्ज केले नसता तर पोलिसांना खूप वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले असते. मराठा आरक्षणावर सरकार काम करीत आहे. पण हा विषय सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित आहे. हा एका दिवसात सुटणारा प्रश्न नाही. मात्र यात राजकीय पक्षांनी हात धुवून घेऊ नये. या घटनेची चौकशी केली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, संभाजी राजे आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते जालन्याकडे रवाना झाले आहेत.
मराठा क्रांती मोर्चा मुंबईत आज तातडीची बैठक
अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणासाठी शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठ्यांवर अमानुष मारहाण करणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा महामुंबई यांची तातडीची बैठक आज दि. 2 सप्टेेंबर रोजी दुपारी 4 वाजता शिवनेरी , शिवाजी मंदिर , दादर आयोजित करण्यात आलेली आहे.
माजी खासदार संभाजीराजे यांनी ट्विटर जालन्यातील घटनेचा निषेध करत एक ट्विट केलेल आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संविधानिक मार्गाने आंदोलनास बसलेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेराव घालत अमानुष लाठीचार्ज केला आणि शांततेच्या मार्गाने आपले हक्क मागण्यासाठी जमलेल्या मराठा समाज बांधवांस पांगवण्यासाठी गोळीबार केला. हे कृत्य अत्यंत निंदनीय असून कुणाच्या आदेशाने हे सर्व घडले याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ खुलासा द्यावा, अन्यथा तुम्हाला समाजाच्या रोषास सामोरे जावे लागेल. मराठा समाजाला दिलेल्या या अमानुष वागणूकीमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वथा राज्याचे गृहमंत्री व सरकार जबाबदार असेल, असं संभाजीराजे म्हणाले आहेत.