(रत्नागिरी / प्रतिनिधी)
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या वृद्धाला येथील विशेष पोक्सो न्यायालयाने १ वर्षाचा कारावास व चार हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. अलिमियाँ महमद सोलकर (वय ७४) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना २८ फेब्रुवारी २०२१ ला सायंकाळी आठ ते नऊच्या सुमारास घडली. सोलकर याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती.
तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली होती. तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक मुक्ता भोसले करत होत्या. तपासात पोलिसांनी संशयितास अटक करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. गुरुवारी (ता. ३१) या घटनेचा निकाल विशेष पोक्सो न्यायाधीश वैजयंतीमाला राऊत यांच्या न्यायालयात झाला. सरकारी पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. विशेष सरकारी अभियोक्ता ॲड. मेघना नलावडे यांनी युक्तिवाद केला. पैरवी अधिकारी म्हणून शहर पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक तेजस्विनी पाटील व पोलिस अर्चना पाटील यांनी काम पाहिले. विशेष पोक्सो न्यायालयाने आरोपीला १ वर्षांचा कारावास व ४ हजार रुपयांची दंडाची शिक्षा ठोठावली.