(राजापूर)
वाणिज्य शाखेत द्वितीय वर्षात शिकत असतानाच नर्सिंग कोर्ससाठी प्रवेश न मिळाल्याने निराश झालेल्या प्रांजली कृष्णा गुरव (वय १७, रा. बंगलवाडी, राजापूर) हिने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. सदर घटना ३० ऑगस्टला घडली होती.
प्रांजली ही वाणिज्य शाखेच्या द्वितीय वर्षात शिकत होती. तिला नर्सिंगच्या कोर्ससाठी प्रवेश घ्यायचा होता. त्यासाठी घरातील सर्वजण प्रयत्न करत होते. या प्रयत्नानंतरही तिला प्रवेश मिळाला नाही. ती निराश झाल्याने विषारी द्रव्य प्राशन करून कोंढेतड पुलाजवळ अर्जुना नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली.
ती पाण्यातून तरंगत येत असताना काही नागरिकांनी पाहिले. याची माहिती मिळताच अनिरुद्ध अरविंद खटावकर व प्रज्योत जयदीप खडपे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोहत जाऊन तिला बाहेर काढले. तिला तातडीने राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले.