(खेड)
घरगुती कारणास्तव घाबरून जाऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणीला परावृत्त करून सुखरूप नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची कौतुकास्पद कामगिरी खेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र मुणगेकर आणि त्यांच्या सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांनी केली.
रत्नागिरी येथे जिल्हा पोलिस क्रीडा स्पर्धाच्या सांगता व बक्षीस वितरण समारंभाच्या कार्यक्रमासाठी मंगळवारी दुपारी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र मुणगेकर पोलिस कर्मचाऱ्यांसोबत निघाले असताना दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मुंबई – गोवा महामार्गावर भरणे नदी पुलाच्या संरक्षक कठड्यावर चढलेली एक तरुण महिला त्यांच्या नजरेत आली. पोलिसी नजरेने त्यांनी ही महिला आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असल्याचा अंदाज बांधून लागलीच त्यांची गाडी वेगाने त्या महिलेच्या जवळ जाऊन थांबली आणि गाडीतून उडी घेऊन सोबत असलेल्या दोन अमलदारांच्या मदतीने शिताफीने या महिलेचे दोन्ही हात पकडून तिला रस्त्याच्या सुरक्षित बाजूला आणले. या महिलेला श्री. मुणगेकर यांनी धीर देऊन वस्तुस्थिती समजून घेतली आणि तिला धीर देऊन तिचे समुपदेशन केले. घरगुती अडचणीमुळे घाबरलेल्या या महिलेने आपली सुटका करून घेण्यासाठी नदीच्या पाण्यात उडी मारून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
प्रसंगावधान दाखवत या महिलेचा प्राण वाचविण्यात उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र मुणगेकर यांच्यासह पोलिस कॉन्स्टेबल श्री. बांगर व चालक पोलिस कॉन्स्टेबल लतिका मोटे यांनी मदत केली. पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या कामासाठी कौतुक करून बक्षीस जाहीर केले