(खेड)
मार्च २०२२ ते १७ ऑगस्ट २०२३ या कालावधीमध्ये, खेड पोलीस ठाणे हद्दीमध्ये तीन भोंदू बाबांनी, “माझ्याकडे दैवी शक्ति असून, तुमच्या घरात गुप्तधन आहे व ते मी तुम्हाला काढून देतो आणि कोट्यवधि रुपये मिळवून देतो” असे सांगून खेड येथील एका गरीब व कष्टकरी महिलेला विश्वासात घेतले व तिच्या घरी, तंत्र-मंत्र वाचण्यात आले, पूजा पाठ करण्यात आली व होमहवन देखील करण्यात आले.
या सर्व गोष्टी केल्यावरच तुम्हाला कोट्यवधि रुपये मिळतील असे या भोंदू बाबांमार्फत सांगण्यात आले व त्या गरीब व कष्टकरी महिलेकडून व तिच्या अन्य नातेवाईकांकडून वेळोवेळी पैशांची मागणी करण्यात आली. या अमिषाला बळी पडलेल्या महिलेकडून, आपण स्वतः कष्ट करून जमवलेले पैसे तसेच आपल्या अन्य नातेवाईकांकडून जमा केलेले पैसे असे सर्व मिळून एकूण ₹४० लाख ९० हजार इतकी मोठी रक्कम या भोंदू बाबांना देण्यात आली व दरम्यानच्या कालावधीमध्ये पुजा पाठ करावेच लागतील नाही तर तुमच्या घरातील दोन नातवंडांना जीवाला मुकावे लागेल अशी भीती देखील या भोंदू बाबां मार्फत घालण्यात आली.
या गरीब महिलेने मोलमजुरी करून घरामध्ये जमा करून ठेवलेले पैसे तसेच त्यांच्या नातेवाईकांनी स्वत:चे सोने दागिने, राहते घर व शेत जमिनी गहाण ठेवून, बचत गटातून कर्ज काढून व आपला मालकीचा जे.सी.बी विकून त्याद्वारे मिळालेले पैसे या तीन भोंदू बाबांना दिले. बरेच दिवस उलटून देखील आपल्याला गुप्तधन मिळत नसल्याने या महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले व तिने थेट खेड पोलीस ठाणे गाठले.
दिनांक २९/०८/२०२३ रोजी या महिलेच्या प्राप्त तक्रारीवरून खेड पोलीसांनी गुन्हा रजि. नं_२५३/२०२३ भा. दं. वि. सं कलम ४२०, ४०६, ३४ व महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ चे कलम ३(१), २ अन्वये गुन्हा दाखल केला व गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी खेड उपविभाग श्री. राजेंद्र मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लागलीच पोलीस निरीक्षक श्री. नितीन भोयर, खेड पोलीस ठाणे यांनी तात्काळ तीनही भोंदू बाबांना शोधण्याकरिता तपासाची चक्रे फिरवत खेड गुन्हे प्रकटीकरण शाखे मार्फत ‘अवघ्या ३ तासात’ गुन्ह्यातील तीनही भोंदू बाबांना १) प्रसाद हरीभाउ जाधव ४७ वर्षे, रा. गिरेवाडी, ता. पाटण, जि. सातारा, २) विवेक यशवंत कदम ४८ वर्षे, रा. करंजवडे, ता. पाटण, जि. सातारा व ३) ओंकार विकास कदम २३ वर्षे, रा. करंजवडे, ता. पाटण, जि. सातारा यांना गिरेवाडी व करंजवडे, ता. पाटण, जि. सातारा येथून ताब्यात घेऊन अटक केली. दिनांक ३०/०८/२०२३ रोजी या तीनही आरोपींना (भोंदू बाबांना) मा. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी खेड यांचे न्यायालयात हजर करण्यात आले असता मा. न्यायालयाने ०६ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. तसेच या गुन्ह्याचा अधिक तपास खेड पोलीस ठाणे मार्फत करण्यात येत आहे.
ही कारवाई, खालील नमूद पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी केलेली आहे,
१) पोलीस निरीक्षक, श्री. नितीन भोयर, प्रभारी अधिकार, खेड पोलीस ठाणे,
२) पोलीस उपनिरीक्षक श्री. हर्षद हिंगे, गुन्हे प्रकटीकरण शाखा प्रभारी, खेड पोलीस ठाणे,
३) पोकॉ/८२३ श्री. राहुल कोरे, खेड पोलीस ठाणे व
४) पोकॉ/१३१५ रूपेश जोगी, खेड पोलीस ठाणे.
रत्नागिरी मधील नागरिकांनी अश्या प्रकारच्या भोंदू बाबांवर विश्वास ठेऊ नये व अश्या प्रकाराला बळी पडू नये तसेच आपली आयुष्याची कमाई ही चांगल्या मार्गी लावण्यास सदैव प्रयत्नशील राहावे. आपल्या आजूबाजूला असे प्रकार घडताना दिसल्यास लागलीच नजीकच्या पोलीस ठाण्यास अथवा डायल ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. धनंजय कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, रत्नागिरी.