(रत्नागिरी)
भविष्यात कोकण हे एक एज्युकेशनल हब म्हणून विकास पावावे, कोकणच्या शैक्षणिक विकासाची जबाबदारी ही सर्व संस्थाचालक, प्राचार्य, सर्व शिक्षकांची आहे, ती आपण समर्थपणे पार पाडली पाहिजे, असे प्रतिपादन र. ए. संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन यांनी येथे केले. गोगटे – जोगळेकर महाविद्यालयात प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान ३.० (PM-USHA 3.0) या विषयावरील कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या उच्च शिक्षण विभागाच्या वतीने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या माध्यमातून महाविद्यालयांच्या सर्वांगीण प्रगती आणि सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविल्या जातात. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान ३.० (PM-USHA 3.0) या नव्या अभियानाची सुरुवात केली आहे. या अभियानाअंतर्गत विद्यापीठ अनुदान आयोगाकडून अनुदानित महाविद्यालयांना सक्षमीकरणासाठी पाच कोटी रुपयांचे विशेष अनुदान दिले जाणार आहे. या अभियानात सहभागी होण्याची प्रक्रिया आणि त्या संदर्भात माहितीपर मार्गदर्शन मिळावे या हेतूनेगोगटे जोगळेकर महाविद्यालयात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुदानित महाविद्यालयांतील प्राचार्य आणि प्राध्यापकांकरिता प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (PM-USHA) या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन त्या र.ए. संस्थेच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर मनोगतातून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी सदर कार्यशाळा आयोजनामागील पार्श्वभूमी, तिचा उद्देश यावर प्रकाश टाकला. यानंतर महाराष्ट्र राज्य शासनाचे रुसा समितीवरील वरिष्ठ मार्गदर्शक सल्लागार प्रा. डॉ. प्रमोद पाब्रेकर यांनी पीएम-उषा अभियान, त्याची रचना, प्रक्रिया, कार्यशाळा आयोजनामागील हेतू याविषयी माहिती उपस्थितांना देऊन कोकणातील महाविद्यालयांच्या सक्षमीकरणासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊनएक विशेष प्रारूप विकसित करणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना शिल्पाताई पटवर्धन म्हणाल्या, जगाच्या पाठीवर सर्वात जास्त हुशार माणसे कोकणात जन्माला आली असल्याचे म्हटले जाते. परंतु असे असले तरी कोकण आर्थिकदृष्ट्या मागे राहिले आहे. कोकणचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची असून, कोकण हे एक एज्युकेशनल हब म्हणून विकास पावले पाहिजे त्या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. या प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे सहकार्यवाह प्रा.श्रीकांत दुदगिकर, महाराष्ट्र राज्य शासनाचे रुसा समितीवरील वरिष्ठ मार्गदर्शक सल्लागार प्रा. डॉ. प्रमोद पाब्रेकर आणि प्रा. डॉ. अजित टिळवे, प्रभारी प्राचार्य डॉ.प्रफुल्लदत्त कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य प्रा.डॉ. मकरंद साखळकर आदी उपस्थित होते.
यानंतर प्रा. डॉ. प्रमोद पाब्रेकर आणि प्रा. डॉ. अजित टिळवे यांनी पीएम-उषा ३.० अभियान, त्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया, त्यासोबत जोडावयाची महाविद्यालयीन कागदपत्रे, रुसा अभियानाअंतर्गत केंद्र शासनाकडून दिले जाणारे अनुदान, अनुदान मिळण्याचे निकष, इ.विषयी उपस्थितांना पीपीटीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. कार्यशाळेदरम्यान त्यांनी प्रश्नोत्तरांद्वारे उपस्थित प्राचार्य आणि प्राध्यापक प्रतिनिधींचे शंकानिरसन केले. या कार्यशाळेत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुदानित महाविद्यालयांतील प्राचार्य आणि प्राध्यापक उपस्थित होते.
कार्यशाळेच्या समारोपाप्रसंगी काही निवडक महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा.डॉ.विवेक भिडे यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य प्रा.डॉ. मकरंद साखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्र शाखा उपप्राचार्या प्रा.डॉ. अपर्णा कुलकर्णी, प्रा.डॉ. विवेक भिडे, प्रा.डॉ. अजिंक्य पिलणकर, प्रा.निलेश पाटील, प्रा.सूर्यकांत माने यांनी परिश्रम घेतले.