(मुंबई)
महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये भारतीय रेल्वेचं मोठं जाळं असून कोट्यवधी प्रवासी दररोज रेल्वेतून प्रवास करत असतात. यामुळे भारतात धावणाऱ्या रेल्वेंची संख्याही सातत्याने वाढत आहे. परंतु आता रेल्वेतील स्लीपर कोचमध्ये प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी होत असल्याने भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे.
रेल्वेतील स्लीपर कोचला जनरल कोचमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आला असून त्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचं समजते. ज्या रेल्वेत स्लीपर कोचमधील प्रवाशांची संख्या कमी असेल त्या रेल्वेत हा निर्णय लागू करण्यात येणार आहे.
देशातील विविध राज्यांतून दिवसा धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये स्लीपर कोचचं जनरल कोचमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. लोकल प्रवासासाठी फायदेशीर ठरणाऱ्या जनरल कोचवरील भार कमी करण्यासाठी स्लीपर कोच हटवण्यात येणार असल्याची माहिती आहे. जनरल कोचमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून रेल्वेला अतिरिक्त महसूल मिळणार आहे. तसेच लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही जनरल कोचची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
रेल्वेच्या स्लीपर कोचमध्ये ७५ ते ८० प्रवाशांना प्रवास करण्याची सोय असते. तर जनरल कोचमध्ये १८० ते २०० प्रवासी प्रवास करत असतात. जास्त महसूल मिळत असल्याने रेल्वेकडून थ्री टायर एसी कोचची संख्या वाढवण्यात आली आहे. परंतु स्लीपर कोचमधील प्रवाशांची संख्या कमी होत असल्याने त्यालाही जनरल कोचमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. त्यामुळं आता रेल्वेच्या महसूलात आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय रेल्वेकडून डब्यांमध्ये पिण्याचे पाणी व नाश्त्याची सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे.