(धाराशिव)
श्रावणी सोमवारनिमित्त देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या ऑटोला ट्रकने जोरदार धडक दिली. धाराशीव जिल्ह्यात महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर कर्नाटकहून हैदराबादकडे भरधाव जाणाऱ्या ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एकाच कुटूंबातील चार जणांचा मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भयानक होता की रिक्षाचा चक्काचूर झाला होता. ही घटना 28 ऑगस्ट रोजी सोलापूर-हैदराबाद मार्गावरील मन्नाळी येथे घडली.
या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रेमीला सुनिल जगदाळे ( 32), सुनिल जगदाळे, अनुसया महादेव जगदाळे, पुजा विजय जाधव असे अपघातात मृत्यू झालेल्या भाविकांची नावे आहेत. मृत सुनील आपल्या मालकीच्या (MH२४- M –१३१९) या पियाजिओ एप्पे ऑटोमधून देवदर्शनासाठी कर्नाटक मधील अमृत कुंड येथे गेले होते. देवदर्शनावरून परतताना हैद्राबादहुन सोलापूरकडे जाणाऱ्या (KA५६- ०५७५) ट्रकने जोरदार धडक दिली.
अपघाताची माहिती मिळताच बसवकल्याणचे आमदार शरणू सलगर यांनी घटनास्थळाला भेट दिली. तर उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची विचापूस केली. या अपघातात दोन लहान मुले बचावले आहेत. अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर बसवकल्याणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी शिवमसू राजपूत, मंडळ पोलीस निरीक्षक सुवर्णा मलशेट्टी, पोलीस हवालदार राजशेखर रेड्डी, मल्लीकार्जुन सलगरे यांनी अपघातस्थळी जात जखमींना उमरग्यातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.