(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
रस्त्यांवर मोकाट फिरणारी गुरे वाहनचालकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहेत. मुंबई गोवा महामार्गावरील धामणी ते संगमेश्वर भागात गुरांचा मुक्त संचार दिसतो. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होणे हे नित्याची बाब बनली आहे. विशेष म्हणजे कितीही हॉर्न वाजवला तरी ही गुरे आपली जागा सोडत नाहीत. त्यामुळे मग या गुरांना हाकलण्यासाठी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागतेय. वाहतूक रोखणारी ही गुरे वाहतूक पोलिसांचे काम करत आहेत असे म्हटले तर ते अतिशयोक्ती ठरणार नाही.
मुंबई गोवा महामार्गावरील धामणी ते संगमेश्वर या प्रमुख मार्गांवर पंधरवड्यापासून मोकाट दहा ते बारा गुरांचा ताफा थेट रस्त्यांवर बसत असल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण होत आहे. रस्ता व्यापून गुरे मध्यभागी बसत असल्याने अपघाताची भिती देखील आहे. यावर प्रशासनाने दुर्लक्ष न करता तातडीने ठोस निर्णय घेण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
काही महिन्यांपूर्वी संगमेश्वर येथे मोकाट फिरणाऱ्या गाईला दुसऱ्या एका मोठ्या गाडीने जोरदार धडक दिली. त्यात गाईचे पुढील दोन्ही पाय पॅक्चर झाले. स्थानिक नागरिकांनी प्रथमोपचार करून गाईला खेड येथील गोशाळेत पाठविण्यात आले होते. मात्र असे अपघात होऊन देखील मालक आपली गुरे घरी घेऊन जात नसल्याचे दिसून येत आहे. गुरांच्या अपघातात एखाद्या वाहनचालकाला आपला प्राण गमवावा लागू शकतो. यातून ही समस्या किती गंभीर आहे याचा प्रत्यय येतो.
संगमेश्वर शहरात मोकाटपणे फिरणाऱ्या या गुरांचा नागरिकांसह वाहनचालकांना मोठा त्रास होत असतानाही गुरांचे मालक आपली गुरे घेऊन जाण्यास दुर्लक्ष करीत असल्याचे नेहमीच दिसून येत आहे. संगमेश्वर बाजारपेठेत मोकाट गुरांची संख्या वाढती आहे. मोकाट गुरांबद्दल संबंधित मालकांकडून बेफिकिरी दाखविण्यात येत असताना अशा मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आता नागरिकांमधून करण्यात येत आहे.