(नवी मुंबई)
सीबीआयच्या चौकशीला कंटाळून सीमाशुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी मयंक सिंग यांनी आत्महत्या केली. मयंक सिंग यांच्या घरी सीबीआयने गुरुवारी, २४ ऑगस्ट रोजी छापेमारी केली होती. यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी खारघर येथील तळोजा मध्यवर्ती तुरुंगालगतच्या तलावात उडी मारून आत्महत्या केली. त्यांनी सीबीआय चौकशीला कंटाळून ही आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे.
मयंक सिंग यांच्याविरोधात सीबीआयने न्हावा-शेवा येथील नेहरू कस्टम हाऊसच्या बॉंड सेक्शनमधील भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. कस्टम विभागाकडे प्रलंबित असणारी दोन बिले मयंक सिंग यांनी लाच घेऊन दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
याच प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआय मयंक सिंग यांच्या नवी मुंबईतील राहत्या घरी पोहोचले होते. या तपासणीत बॉंड अधिकाऱ्यांना दोन बिलांमध्ये काही विसंगती आढळल्या होत्या. त्यामुळे सीबीआय युनिटने २१ ऑगस्ट रोजी मयंक सिंग तसेच त्यांच्यासोबत असलेले इतर कस्टम अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. २४ ऑगस्टला मयंक त्यांच्या घरी छापेमारी झाली आणि दुसऱ्याच दिवशी, म्हणजे २५ ऑगस्टला मयंक सिंग यांनी तळोजा येथील तलावात उडी मारून आत्महत्या केली.
मयंक सिंग यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिट्ठी त्यांच्या गाडीमध्ये सापडली असून त्यात त्यांनी कस्टम विभागातील काही अधिकाऱ्यांची नावे लिहून ठेवली आहेत, असे समजते. त्यानुसार खारघर पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.