रत्नागिरी, ता. २९ : नर्सिंग व डॉक्टर हे प्रोफेशन वेगळे आहे. कारण रुग्णाची काळजी घेताना चूक झाली तर वाईटही होऊ शकते. रुग्णाची सेवा केली तर तो बरा होतो. डॉक्टर निदान करतात व नर्सेस औषधोपचाराची अंमलबजावणी करतात. त्यांचा रुग्णाशी संपर्क असतो. रुग्ण औषध घेत नसेल तर त्यांचे समुपदेशन करावे लागते. रुग्ण बरा झाला पाहिजे याची जबाबदारी नर्सेसवर असते. या कामातून सुखसमाधान मिळते, या कामाची तुलना कशाशीच करता येत नाही. हे एक पवित्र कार्य आहे. रुग्णाचे आईवडीलही आपणच असतो. ही सेवा आपुलकीने करा. कोविड महामारीच्या वेळी अडचणीच्या काळात माजी आमदार बाळ माने यांनी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन रुग्णालयात सेवा बजावण्यास पाठवले. या विद्यार्थीनींनी चांगल्या पद्धतीने काम केले. त्यामुळे रुग्णालय चालू राहिले आणि त्यातून बऱ्याच जणांचे प्राणही वाचवता आले. याबद्दल दि यश फाउंडेशन व श्री. माने आणि कॉलेजचे कौतुक, असे गौरवोद्गार जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी काढले.
दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंगच्या लॅंप लायटिंग कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. रविवारी मराठा भवन येथे हा कार्यक्रम झाला. या वेळी अध्यक्षस्थान दि यश फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त, माजी आमदार बाळ माने यांनी भूषवले. व्यासपीठावर जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. संघमित्रा फुले, इन्फिगो आय केअर हॉस्पीटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकुर, ऑप्थर्मोलॉजिस्ट सूरज जगवानी, सहव्यवस्थापकीय विश्वस्त सौ. माधवी माने, हेमंतराव माने, कॉलेजच्या रजिस्ट्रार सौ. शलाका लाड आदी उपस्थित होत्या. या वेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी बाळ माने म्हणाले की, आजचा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. १९९९ मध्ये ३४ व्या वर्षी आमदार झालो. २००२ मध्ये मातोश्रींचे निधन झाले. जगातली सर्व साधने मला उपलब्ध होती. परंतु वैद्यकीय सेवा मिळूनही, आमदार असूनही वाचवू शकलो नाही. माझ्यासारख्या माणसाची ही स्थिती आहे. पण जनतेला आरोग्य सेवा मिळू शकल्या नाहीत म्हणून अनेकांना जग सोडावे लागले असेल. त्यावेळी एकाने नर्सिंग कॉलेज सुरू करण्याची सूचना केली. डॉक्टरप्रमाणेच मदत करणारी नर्ससुद्धा महत्वाची घटक आहे. रुग्णाची सेवा करणारी नर्स. कोकणातले पहिले नर्सिंग कॉलेज सुरू झाले. १६ वर्षांत दोन हजार कुटुंबातील मुलींना शिक्षण देता आले. या विद्यार्थीनी आजही महाराष्ट्रात सेवा बजावत आहेत.
ते पुढे म्हणाले की, प्रगत, प्रशिक्षित मनुष्यबळ मिळू लागले. २००६ ची पहिली बॅचचे सर्व विद्यार्थी सरकारी नोकरी करत असून त्यांना किमान ८० हजार रुपये पगार मिळतोय. समाजात आपण भूमिका, जबाबदारी मांडतो. कोकण प्रगतशील आहे. कोकणने सर्वाधिक भारतरत्न देशाला दिले. माणूस निरोगी राहणे आवश्यक आहे. कोविडच्या काळात भीतीचे वातावरण असताना आमच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा रुग्णालयात सेवा बजावली. काळजी जरूर घेतली पाहिजे. पण घाबरून चालणार नाही. आरोग्य सेवेत अडचणी आल्या तरी संकटाचे संधीत रुपांतर करता येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात. सुदृढ समाज निर्माणासाठी योगदान देत आहोत.
श्री. माने यांनी विद्यार्थिनींनाही बहुमोल मार्गदर्शन केले. ते म्हणाले, तुम्ही आरोग्य क्षेत्रात आला आहात. समाजात आज चांगल्या पगाराची नोकरी म्हणून याकडे पाहिले जाते. पण रुग्णालयात समोर आलेला रुग्ण हा बरा होऊन घरी गेला पाहिजे. मग घरात जरी काही अडचण असेल तर त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होता कामा नये.
डॉ. संघमित्रा फुले यांनी सांगितले की, नर्सिंग कोर्स सुरू होताना लॅंप लायटिंग केले जाते. दिवा हे अंधारातील व्यक्तीला प्रकाश दाखवणारे कष्ट, मेहनत,
रुग्णांशी थेट संपर्क असतो. सहनशील, समजून घेणारी, सेवा द्यायची आहे. फ्लॉरेन्स नाइंटिगेल यांनी रुग्णसेवेचे व्रत स्वीकारले. जागतिक युद्धात जखमी सैनिकांची सेवा त्यांनी केली. सेवा, शुश्रुषा, मानसिक आधारामुळे सैनिक बरे होऊ लागले. कोविड काळात या विद्यार्थिनींनी सेवा दिली आहे.
डॉ. ठाकुर यांनी डॉक्टर म्हणून पहिली नोकरी करताना आलेले अनुभव सांगितले. ते म्हणाले, नर्स रुग्णाची काळजी घेत असते. त्यातून डॉक्टर योग्य उपचार करत असतो. कधीही नोकरी पगारासाठी म्हणून करू नका. उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरी करताना कामाचे स्वातंत्र्य, शिकण्याची संधी व शिकवणारे असतील तिथे करा. हेच तुमचे भांडवल आहे. मीसुद्धा नर्सिंग कॉलेजमध्ये शिकवत होतो. त्यावेळच्या बॅचच्या विद्यार्थिनी आता मेट्रन म्हणूनही सेवा देत आहेत.
सूत्रसंचालन रीमा खान आणि समृद्धी सुर्वे यांनी केले. अंतिम वर्ष बीएसस्सी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. वार्षिक अहवालाचे वाचन मानसी मुळ्ये यांनी केले. लॅंप लायटिंगची आवश्यकता, प्रथा आणि त्याचा उद्देश याबाबत प्र. प्राचार्य रमेश बंडगर यांनी माहिती सांगितली. फ्लॉरेन्स नाइंटिगेल यांनी रुग्ण सेवा, शुश्रूषा यामध्ये अमूलाग्र क्रांती केली. त्यांचा आदर्श सर्व विद्यार्थिनींनी घ्यावा, असे आवाहन केले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शपथ प्रा. चेतन अंबुपे यांनी दिली. अंतिम वर्ष बीएस्सीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. त्यानंतर पथनाट्यही सादर करण्यात आले. अमेय भागवत यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नर्सिंग कॉलेजच्या सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.