(रत्नागिरी)
रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी केली. येत्या डिसेंबरमध्ये या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. रोख रक्कम, सन्माचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. समाजातील चांगल्या व्यक्तींची माहिती मिळवत आणि कोणत्याही अर्ज, प्रस्तावांशिवाय हे पुरस्कार प्रतिवर्षी दिले जात आहे. त्यामुळे या पुरस्कारांमुळे चांगल्या व्यक्तींचे समाजात कौतुक होत आहे.
राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार जलतरणपटू निधी शरद भिडे हिला जाहीर झाला आहे. आतापर्यंत तिने एकूण 38 पदके पटकावली आहेत. महेश मिलके स्विमिंग ग्रुपमध्ये ती प्रशिक्षण घेत आहे. जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धांमध्ये सुवर्णपदके मिळवली आहेत. विजयदुर्ग, कोल्हापूर येथे वीर सावरकर जलतरण स्पर्धा, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज अमृत महोत्सवी वर्ष, यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत पदकांची लयलूट केली आहे. मॉडर्न पेंटथेलॉन (रन, शूट, स्वीम, रन शूट रन, रन स्वीम रन) या स्पर्धा प्रकारामध्ये पुणे बालेवाडी येथे झालेल्या नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत निधीने दोन सुवर्णपदके व १ कास्यपदक पटकावले आहे. पुणे येथे महिला दिनानिमित्त खेलो इंडिया स्पर्धेत ब्रॉन्झपदक पटकवले आहे. पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये निधी हिची भुवनेश्वर, ओडिसा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या या अतुलनीय कामगिरीबद्दल तिला राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
उद्योजक पुरस्कार (काटवली, देवरूख) येथील सौ. संपदा विवेक पुरोहित यांना दिला जाणार आहे. १९९० पासून घरगुती स्वरूपात व्यवसायाची सुरवात केली. २००१ पासून स्वाद पेप्सीला सुरवात केली. २३ वर्षे रत्नागिरी जिल्ह्यात त्याचे वितरण सुरू आहे. यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
उद्योगिनी पुरस्कार हरचेरी येथील सौ. रश्मी विनोद प्रभुदेसाई यांना देण्यात येणार आहे. त्या पर्यावरणपूरक व रसायनविरहित सॅनिटरी नॅपकिन्स मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय करतात. ग्रामीण भागातील महिलांसाठी हे खूप उपयुक्त आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात, अनाथाश्रमामध्ये हे नॅपकिन्स वितरित केले जातात. रत्नागिरी, पुणे, कराड, कोल्हापूरपर्यंत पुरवठा केला जात आहे.
आचार्य नारळकर आदर्श शिक्षक पुरस्कार पू. प्रा. केंद्रशाळा (गुजराळी, राजापूर) येथील प्राथमिक शिक्षक अनिल भालचंद्र जायदे यांना जाहीर झालाय. दुर्गम भागात त्यांनी ३६ वर्षे शिक्षणसेवा केली आहे. राजापूर तालुक्यात प्रथमच जी प्लस १ शाळा इमारत बांधकाम, पेंडखळे नं. २ इमारत बांधकाम व १०० टक्के डिजिटल शाळा, सलग ३ वर्षे चौथी, सातवी शिष्यवृत्ती परीक्षा, बीडीएस, एमटीएस, गणित संबोध परीक्षांचा निकाल १०० टक्के लागला. त्यांच्या शाळेला उत्कृष्ट पटनोंदणी पुरस्कार, आदर्श शाळा पुरस्कार, इन्स्पायर अॅवॉर्ड मिळाले आहे. त्यांना गायन, वादन, नाट्यसंगिताची आवड आहे.
आदर्श कीर्तनकार पुरस्कार देवरूखच्या ह. भ. प. कुमार विष्णू भाट्ये यांना देण्यात येणार येणार आहे. त्यांनी कीर्तनाविषयी प्रचंड आवड, आस्था यातून कीर्तनात संवादिनी साथ करायला सुरवात केली. त्यानंतर कीर्तन करायला लागले. काका विश्वनाथ भाट्ये, महेश सरदेसाई, दत्तराज वाडदेकर बुवा यांचे मार्गदर्शन लाभले.
आदर्श पौरोहित्य पुरस्कार (आंब्रड, कुडाळ) वे. मू. विष्णू सखाराम करंबेळकर यांना देण्यात येणार आहे. वेदशास्त्रोत्तेकजक सभा, पुणे, वे. मू. दिनकरगुरु फडके गुरुजी यांच्याकडे ऋग्वेद अध्ययनाला सुरवात केली. ऋग्वेदाचे व षडंगाचे अध्ययन झाल्यावर पुणे वेद पाठशाळा येथे स्मार्त याज्ञीक शिक्षण, २००० साली स्वतः घरी मुलांना शिक्षण देण्यास सुरवात, भगवती देवी माध्यमिक विद्यालयात कोषाध्यक्ष, शालेय शिक्षण समितीवर कार्य करत आहेत. दरवर्षी काही गरीब विद्यार्थ्यांना दानशूर मित्रांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाटप करतात. महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ (कुडाळ) मार्फत कार्य, श्री दुर्गोपासक ऐक्यवर्धक संघ, वागदे, कणकवली या धार्मिक संस्थेचे अध्यक्ष आहेत. वेद, वेदांगे यांचे शिक्षण घेतलेल्यांचे अध्ययन निरंतर पाठ राहावे व त्यांच्या परीक्षा, पारायण, शिष्यवृत्त्या, असा दृष्टिकोन ठेवून वेमू मुरवणे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली वेदवेदांग प्रतिष्ठान न्यासाची स्थापना केली. त्याचे सहसचिव आहेत.
दर्पण पुरस्कार गुहागरचे दै. सकाळचे प्रतिनिधी मयुरेश मुकुंद पाटणकर यांना दिला जाणार आहे. ते १९९९ पासून बातमीदार म्हणून दै. तरुण भारत, रत्नागिरी टाइम्स, पुढारीमध्ये व २००५ पासून सकाळमध्ये कार्यरत आहेत. गुहागर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. साप्ताहिक सकाळ, साप्ताहिक विवेक, लोकराज्य, महिला उद्योजक विशेषांक अशा अंकांतूनही त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे. सागरी सीमा मंचचे विभाग संयोजक, श्री देव कोपरी नारायण देवस्थानचे विश्वस्त, मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा सरचिटणीस म्हणून काम पाहत आहेत. गुहागरचे पर्यटन वाढण्यासाठी सातत्याने लिखाण करतात. सामाजिक प्रश्नांवर लढा देत अनेकांना न्याय मिळवून दिला आहे. कोरोना काळात परप्रांतीयांना अन्नधान्य वाटप, कॅन्सरग्रस्तांना उपचारांसाठी बाहेरगावी जाण्यासाठी मदत केली. रक्तदान शिबिरांचे आयोजन केले असून चिपळूण येथील पूरग्रस्तांना मदत केली.
धन्वंतरी पुरस्कार डॉ. मुरलीधर पुरुषोत्तम प्रभुदेसाई (कोलगाव, सावंतवाडी) यांना देण्यात येणार आहे. ते आयुर्वेद पारंगत असून उच्चशिक्षित आहेत. त्यांनी देवरुखच्या मातृमंदिर आणि वरळीच्या पीपल्स मोबाईल हॉस्पीटलमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून सुरवातीला सेवा बजावली. १९८६ पासून सिंधुदुर्ग येथे पत्नी डॉ. माधुरीसोबत संशोधन व पंचकर्म प्रॅक्टिस करतात. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली असून शेकडो व्याख्याने दिली आहेत. आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये संशोधन लिखाण प्रसिद्ध झाले आहे. ‘कोटकामते’ (ता. देवगड) येथे सुमारे तीस वर्षांपूर्वी वैयक्तिक ओळखीद्वारे हायस्कूल सुरू केले. त्यामुळे ग्रामस्थांच्या मुलांना हायस्कूलसाठी दुसरीकडे जावे लागत नाही.