(नवी दिल्ली)
निवडणूक प्रक्रियेत मतदारांचा अधिकाधिक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी निवडणूक आयोगाने भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची नॅशनल आयकॉन म्हणून निवड केली आहे. भारतीय निवडणूक आयोगाने मंगळवारी याची घोषणा केली आहे. आज सचिन तेंडुलकर आणि निवडणूक आयोग यांची एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी होणार आहे. हा सामंजस्य करार तीन वर्षांसाठी असणार आहे.
या कराराअंतर्गत सचिन तेंडुलकर मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करेल. त्यासाठी तो तीन वर्षांपर्यंत काम करणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीत आगामी निवडणुकांमध्ये विशेषत: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी सचिन तेंडुलकरच्या अद्वितीय प्रभावाचा फायदा होईल. त्यामुळे सचिन तेंडुलकर यांचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरेल. सचिन तेंडुलकर यांचा युवकांमध्ये मोठा प्रभाव आहे. त्यामुळे नवे मतदार आणि आधीचे मतदारही मतदानासाठी पुढे येतील, असे सांगितले.
निवडणूक आयोग या सामंजस्य कराराच्या माध्यमातून मतदारांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. शहरी उदासीनता आणि मतदानाप्रती तरुणांना प्रोत्साहन करण्याचे निवडणूक आयोगाचे उद्दिष्ट आहे. अधिकाअधिक मतदारांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने आयोग विविध क्षेत्रातील नामवंतांना आपला नॅशनल आयकॉन म्हणून जाहीर करते.
गतवर्षी अभिनेते पंकज त्रिपाठी यांना नॅशनल आयकॉन म्हणून मान्यता दिली होती. त्याआधी 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान, एमएस धोनी, आणिर खान आणि मेरी कोम यासारख्या दिग्गजांना नॅशनल आयकॉन केले होते. यंदा सचिन तेंडुलकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.