(श्रीहरिकोटा)
चांद्रयान-३ ही भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम आहे. आज (बुधवार दि. २३ ऑगस्ट रोजी) संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयानाचे सॉफ्ट लँडिंग होणार असल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले. त्यासाठी इस्रोचे शास्रज्ञ तयार असून विक्रम लँडरची स्थिती पाहून या यानाचे चंद्रावर लँडिंग करण्यात येणार आहे. हे यान यशस्वीरित्या चंद्रावर उतरणार असल्याचा विश्वासही इस्रोच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयानाचे लँडिंग करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी भारतीयांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या मोहिमेचे थेट प्रक्षेपण करण्याचे निर्देश यूजीसीने विद्यापीठांना दिले आहेत. त्यामुळे शाळांसह विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना मोहीम लाईव्ह पाहता येणार आहे.
या महत्वपूर्ण प्रक्रियेसाठी इस्त्रो अधिकाऱ्यांसह अनेक लोकांनी ‘१७ मिनिटांचा थरार’ संबोधले आहे. लँडिंगची संपूर्ण प्रक्रिया ऑटोमॅटिक होईल. याच्या अंतर्गत लँडरला आपले इंजिनला योग्य वेळी व योग्य उंचीवर चालू करावे लागेल. त्याला योग्य प्रमाणात इंधनचा वापर करावा लागणार आहे. त्याचबरोबर खाली उतरण्यापूर्वी लँडरला खात्री करावी लागेल की, कोणत्या प्रकारचा अडथळा किंवा डोंगराळ भाग अथवा खड्डा नाही. सर्व मानकांची चाचणी केल्यानंतर व लँडिंगचा निर्णय घेतल्यानंतर इस्त्रो बेंगळूरुच्या जवळ बयालालूमध्ये आपल्या भारतीय अंतराळ नेटवर्क (आयडीएसएन) मार्फत निर्धारित वेळेवर लँडिंगच्या काही तास आधी सर्व आवश्यक कमांड एलएमवर अपलोड करेल.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवाची बाजू ही अत्यंत खडतर आहे. इथे अनेक खड्डे आहेत. त्यामुळे चंद्राच्या या भागावर चांद्रयानाचे लँडिंग करणे इस्रोसाठी आव्हानात्मक आहे. त्यामुळे इस्रोच्या शास्रज्ञांनी या यानाची रचनाच अशा प्रकारे केली आहे की या सर्व परिस्थितीत हे यान लँडिंग करण्यास सक्षम असेल. तसेच याच परिस्थितीत यानामध्ये जास्त इंधनसाठादेखील समाविष्ट करण्यात आला आहे. तसेच हे यान मजबूत करण्यात आले आहे. जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत यानाला धक्का पोहोचणार नाही. भारताच्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेचे श्रीहरिकोटा येथून १४ जुलै रोजी यशस्वीरित्या प्रक्षेपण करण्यात आले होते. आता काही तासांमध्ये हे यान चंद्रावर उतरणार आहे.
द. ध्रुवावर पोहोचणारा भारत पहिला देश ठरणार
आतापर्यंत तीन देशांनी आपली चांद्रमोहिम यशस्वी केली आहे. त्यामध्ये रशिया, अमेरिका आणि चीन या देशांचा समावेश आहे. पण यापैकी कोणत्याही देशाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपले यान उतरवले नव्हते. भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपले यान उतरवणारा पहिला देश ठरणार आहे. दक्षिण ध्रुवावर भारताचे यान उतरून तेथील संशोधन करणार आहे.
इस्रोच्या अहमदाबाद केंद्राचे प्रमुख निलेश एम. देसाई यांनी सांगितले की, चांद्रयान-३ संदर्भात २३ ऑगस्ट रोजी लँडिंगच्या काही तास आधी लँडिंगसाठी ही वेळ योग्य आहे की नाही. जर परिस्थिती अनुकूल नसेल तर हे लँडिंग २७ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे.
चंद्रयान ३ चे थेट प्रक्षेपण येथे पहा
चांद्रयान ३ चा थरार पुढील ठिकाणी आपण लाईव्ह बघू शकता.
ISRO Website https://isro.gov.in
YouTube https://youtube.com/watch?v=DLA_64yz8Ss
Facebook https://facebook.com/ISRO