(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील कुणबी हितवर्धक मंडळाच्या दहीहंडी सरावाला नुकताच मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. या दहीहंडी सरावाचा शुभारंभ कुणबी हितवर्धक मंडळाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
कोकणातील सर्वात अतिउत्साहाचा असलेला गोपाळकाला अर्थात दहीहंडी उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांची दहीहंडी फोडण्यासाठी मोठी उत्सुकता शिगेला पोहचली आहे. याच पार्श्वभूमीवर गोविंदा पथकांची तयारी सुरु झाली असून मालगुंड येथील कुणबी हितवर्धक समाज मंडळाचे गोविंदा पथक सध्या जोरदार सरावाला लागले आहेत.
या गोविंदा पथकाकडून संपूर्ण रत्नागिरी तालुक्यात बांधण्यात येणाऱ्या उंचच उंच दहीहंडी फोडण्यासाठी अतिशय लक्षवेधी कामगिरी केली जाते. तसेच या गोविंदा पथकाने अल्पावधीतच आपली लोकप्रियता मिळवून दहीहंडी उत्सवातील नामांकित गोविंदा पथक म्हणून आपले नाव कोरले आहे. त्यामुळे या गोविंदा पथकाच्या कामगिरीकडे यंदाही संपूर्ण मालगुंड परिसराबरोबर रत्नागिरी तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून राहणार आहे. एकूणच कुणबी समाज हितवर्धक मंडळाच्या गोविंदा पथकाने आपल्या जोरदार सरावात आघाडी घेतली असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.